माळशिरस तालुक्यात सारी सदृश्य दोन रुग्ण; कोरोना तपासणीसाठी एका सरकारी कर्मचार्याचा स्वॅब सोलापूरला पाठवला .
अकलूज( प्रतिनिधी): माळशिरस तालुक्यात सारी सदृश्य दोन रुग्ण आढळून आले. सुदैवाने त्यांच्या कोरोना संदर्भातील चाचण्या निगेटिव्ह आल्या. त्यानंतर माळशिरस येथील एका सरकारी कर्मचाऱ्याचा स्वॅब तपासणीसाठी सोलापूर येथे पाठवण्यात आला आहे. अशा नाजूक पार्श्वभूमीवर गावपातळीवरील ग्राम दक्षता समित्या व तालुका पातळीवरील प्रशासनाने तालुक्यात अमलात आणलेली संचारबंदी जनतेच्या व तालुका वासियांच्या हिताचीच आहे. तालुक्यातील एकाही नागरिकास कोरोना ची लागण होऊ नये यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या प्रशासनास नैतिक पाठबळ देणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव गावस्तरावर रोखण्यासाठी ग्राम दक्षता समित्यांना अधिकार देण्यात आले आहेत. या ग्राम दक्षता समित्या आणि माळशिरस पंचायत समिती यांनी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ न देण्यासंदर्भात विशेष आराखडा तयार करून कार्यास केंव्हाच सुरुवात केलेली आहे. सोलापूर शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे पाहून गत रविवारी तालुक्यात एक दिवसाचा जनता कर्फ्यू यशस्वीरित्या पाळण्यात आला. सोलापूर शहरातील या संसर्गाचे लोन ग्रामीण भागात पोहोचू नये या धास्तीने माळशिरस तालुक्यातील प्रशासन आणखी जोमाने कार्यास लागले आहे. नेमक्या अशा परिस्थितीत गिरझणी ता. माळशिरस येथील एक रुग्ण व बेंबळे ता. माढा येथील एक रुग्ण अकलूज येथील खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेताना ते सारी या संसर्ग आजाराचे सदृश्य असल्याचे आढळून आले. त्यानंतर या दोन्ही रूग्णांचे स्वॅब कोरोनाच्या तपासणीसाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले. सुदैवाने या दोन्ही रुग्णांचे स्वॅब निगेटिव्ह आले, मात्र हे दोन्ही रुग्ण सारी सदृश्य होते असा दुजोरा अकलूज उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुप्रिया खडतरे यांनी दिला आहे .त्याशिवाय हे रुग्ण ज्या खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत तेथील डॉक्टरांनीही त्यासंदर्भात दुजोरा दिलेला आहे. त्यानंतर माळशिरस येथील एका सरकारी कर्मचाऱ्याचा स्वॅब कोरोना संसर्गाच्या तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर माळशिरस तालुका स्तरावरील प्रशासन आणखी दक्ष झाले आहे. त्या सरकारी कर्मचाऱ्याच्या स्वॅबच रिपोर्ट आला नसला तरी सरकारी यंत्रणा उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यात व्यस्त झाल्या आहेत.
सारी या संसर्गाचा प्रदुर्भाव झालेल्या रुग्णाला कोरोना ची लागण होण्याचा धोका अधिक संभवतो. त्यामुळे सारी चे रुग्ण शोधून त्यांच्यावर वेळीच उपचार करणे हे खूप महत्वाचे असते. अशा या सर्व पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील गाव पातळीवरील दक्षता समित्या ,प्रांताधिकारी व तहसीलदार आणि त्यांचे महसूल खाते, आरोग्य, पोलीस व पंचायत समिती आणि इतर सर्व शासकीय विभाग रात्रंदिवस कर्तव्य बजावत माळशिरस तालुक्याला कोरोना पासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे करत असताना काही ठिकाणी नागरिकांना थोड्याफार अडचणींना सामोरे जावे लागत असेलही परंतु प्रशासन जे करत आहे ते नागरिकांच्या हिताचेच आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आणि अशा नाजुक परिस्थितीत कसलीही उणीदुणी काढत बसण्यापेक्षा आपल्या कर्तव्य बाबत तत्पर राहण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.
0 Comments