रस्त्यावर फिरणारांवर गुन्हे दाखल करणार : प्रांताधिकारी शमा पवार
अकलूज/ प्रतिनिधी-देशात व राज्यार कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. सोलापूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३० वर गेली आहे. हा रोग माळशिरस तालुक्यात येवू नये यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. त्याच धर्तीवर उद्या गुरुवार दि. २३ एप्रिल पासून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा अकलूज उपविभागाच्या प्रांताधिकारी शमा पवार यांनी दिला आहे.
आज (बुधवार) तालुका प्रशासनाची कोरोना प्रतिबंधासाठी महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीस उपविभागीय पोलिस उपअधिक्षक निरज राजगुरू, तहसीलदार अभिजीत पाटील, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.नितीन एकतपुरे, सचिव डॉ.संतोष खडतरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र मोहिते यांच्यासह पोलिस, प्रशासन व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रांताधिकारी पवार म्हणाल्या, कोरोना या साथ रोगामुळे देशात हजारो लोक बळी पडले आहेत. सोलापूर शहरात या रोगाने पाय पसरायला सुरुवात केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून माळशिरस तालुक्यात प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता कोणतेही दुकान उघडे ठेवल्यास विनाकारण रस्त्यावर आल्यास त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस प्रशासनास दिले आहेत. अत्यावश्यक सेवेतील शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, पेपर विक्रेते व पासधारक व्यक्ती यांना वगळता इतर कोणालाही पेट्रोल पंपावर पेट्रोल दिले जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी पंपावर येवू नये. विनाकारण वाहन घेऊन फिरणारांची वाहने जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असेही प्रांताधिकारी पवार यांनी सांगितले. गेले १५ दिवस तालुक्यातील १८ व्यक्तींना कोरंटाईन करण्यात आले होते. या सर्व जणांची मुदत संपल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. माळशिरस तालुक्याशी पुणे व सातारा जिल्ह्याचा संबंध येतो. या दोन्ही जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आल्या आहेत. इतर जिल्ह्यातून तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यातूनही इतर जिल्ह्यातून तालुक्यात कोणी आले असल्यास नागरिकांनी त्यांची माहिती ग्रामदक्षता समितीला द्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
0 Comments