तुकोबांचा रामदासावर प्रभाव - डॉ. बालाजी जाधव, औरंगाबाद
मध्यंतरी तुकोबांचा एक अभंग मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ज्यात असे लिहिले होते की, 'एकदा म्हणे शिवराय तुकोबांकडे अनुग्रह घेण्यासाठी गेले. तेव्हा तुकोबांनी अभंगाच्या माध्यमातून शिवरायांना सांगितले की माझी तुमचा गुरु होण्याची पात्रता नाही. तेव्हा तुम्हाला जर गुरुच करून घ्यायचा असेल तर त्याचा अधिकार हा रामदासांकडे आहे. तुम्ही त्यांच्याकडे जा आणि रामदासांचा अनुग्रह घ्या.' प्रस्तुत अभंग हा रामदासी बैठकीत, धारकऱ्यांमध्ये बराच लोकप्रिय असावा. कारण तो अभंग फिरवण्यामध्ये यांच लोकांचा जास्त सहभाग होता.
तुकोबांचा प्रत्येक अभंग हा 'तुका म्हणे' या नाममुद्रेने संपतो. कारण त्यांना तशी आज्ञाच विठ्ठल आणि संत नामदेव यांनी दिली होती. (उरले शेवटी लावी तुका ।) त्यामुळे तुकोबांनी शिवरायांना रामदासाकडे पाठवले तो अभंग तुकोबांचाच आहे असे छातीठोकपणे सांगणे भक्तांना सोपे गेले कारण त्या अभंगाच्या शेवटी सुद्धा तुका म्हणे अशी ठसठशीत नाममुद्रा आहे. अर्थात तुकोबांच्या काळात बरेच तुकाराम नावाचे लोक काव्य करायचे ते सुद्धा आपल्या काव्याच्या शेवटी 'तुका म्हणे' ही नाममुद्रा लावायचे. त्यामुळे अशा तुकारामांचे अभंग सुद्धा बऱ्याचदा संत तुकोबांचेच आहेत असा समज बऱ्याच लोकांचा होतो.
याउलट रामदासी संप्रदायातील काही रामदास भक्तांनी रामदासांचे अवास्तव स्तोम माजवण्याचे दृष्टीने बरेच लेखन केले. त्यात रामदास इतरांपेक्षा कसे श्रेष्ठ आहेत हे दाखवण्याची जणू अहमहिकाच लागली होती. अशा वृत्तीतूनच तो 'तुकोबांनी शिवरायांना रामदासाकडे पाठवल्याचा अभंग' एखाद्या रामदास भक्ताने बनवला. बरं असा अभंग लिहिताना त्याने अभंगाच्या शेवटी 'तुका म्हणे' ही नाममुद्रा लावल्याने रामदास भक्ताच्या मनातील भावना या त्या अभंगकर्त्याच्या नसून तुकोबांच्याच आहेत असे प्रथमदर्शनी कुणासही वाटते. किंबहुना तसे वाटावे यासाठीच मोठ्या हातचालाखीने अशा अभंगांची रचना करण्यात आली आणि तुका म्हणे या नाममुद्रेचा वापर करत तो बनावट अभंग तुकोबांच्या नावाने खपवण्यातही आला. असे सर्व अभंग कसे बोगस आहेत हे देहू संस्थानने प्रकाशित केलेल्या गाथेत त्याच्या संपादकीय मनोगतात डॉ सदानंद मोरे यांनी सप्रमाण सिद्ध केलेले आहे. चिकित्सक वाचकांनी देहू संस्थांनचा तो गाथाच वाचावा म्हणजे त्यांचा 'तुकोबांनी शिवरायांना रामदासाकडे पाठवल्याचा गैरसमज दूर होईल'
आता रामदास भक्त रामदासाचे महत्व तुकोबा आणि शिवरायांपेक्षा कितीही वाढवत असले तरी वास्तव मात्र वेगळेच सांगते. तुकोबा ज्या वारकरी परंपरेचे पाईक होते त्या परंपरेला नामदेव-ज्ञानदेवांपासूनचा प्रदीर्घ असा वारसा होता. याउलट रामदासाने ज्या रामदासी संप्रदायाची स्थापना केली त्याला अशी कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. त्यातच ज्यावेळी रामदासाने आपल्या संप्रदाय स्थापनेच्या कार्याला सुरुवात केली त्यावेळी तुकोबा महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झालेले संत होते. तुकोबा एवढे लोकप्रिय होते की वैजापूर तालुक्यातील बहिणाबाई पाठक ज्यावेळी कोल्हापूरला गेल्या त्यावेळी त्यांनी जयराम स्वामी वडगावकर यांचे कीर्तन ऐकले. त्या कीर्तनात त्यांनी तुकोबांचे अभंग ऐकले. कुठे ऐकले कोल्हापुरात ऐकले. तुकोबांचे अभंग ऐकून त्या अक्षरशः वेड्या झाल्या (पारमार्थिक अर्थाने) आणि त्यांना तुकोबांच्या भेटीची ओढ लागली. त्यांनी तसे कबूलही केले आहे, तुकोबांची पदे अद्वैत प्रसिद्धे । तयाच्या अनुवादे चित्त झुरवी ।। एवढी प्रचंड लोकप्रियता तुकोबांच्या वाट्याला आली होती.
तुकोबांचे अभंग मराठी माणसांना तोंडपाठ होत होते. तुकोबांचा प्रभाव बहिणाबाई यांच्यासारख्या उच्चवर्णीय लोकांपासून ते समाजातील इतर घटकांवरही पडला होता. त्याला समकालीन रामदास तरी कसे अपवाद राहतील? तुकोबांच्या अभंगांचा प्रभाव जसा इतरांवर पडला तसा तो रामदासावर सुद्धा पडल्याचे काही दाखले इतिहासात आहेत. डॉ सदानंद मोरे लिखित तुकाराम दर्शन या ग्रंथात काही उदाहरण डॉ मोरेंनी दिलेले आहेत. डॉ. मोरे लिहितात, "खुद्द कल्याणस्वामींच्या हस्ताक्षरामधील समर्थांच्या दोन रचना उद्धृत करून त्यांच्यावर तुकोबांच्या ज्या अभंगांचा प्रभाव आहे ते खाली देतो म्हणजे हा मुद्दा लक्षात येईल." असे म्हणून सदानंद मोरे यांनी रामदासांनी लिहिलेले दोन अभंग उपलब्ध करून दिलेले आहेत. वाचकांनी तो ग्रंथ सुद्धा पडताळून पाहावा. डॉ मोरे यांनी कल्याणस्वामींच्या हस्ताक्षरातील जे दोन अभंग दिलेले आहेत त्यातील एक अभंग इथे आपण पाहूया. म्हणजे रामदासाच्या लेखनावर तुकोबांचा किती प्रभाव पडला होता हे आपल्या लक्षात येईल. तो अभंग पुढीलप्रमाणे-
अर्थेविण पाठ कासया करावे । व्यर्थ का मरावे घोकुनिया ।।
घोकुनिया काय वेगी अर्थ पाहे । अर्थरूप राहे होऊनिया ।।
होऊनिया अर्थ सार्थक करावे । रामदास भावे सांगतसे ।।
खरेतर हा अभंग तुकोबांच्या एका गाजलेल्या अभंगाशी एवढा साधर्म्य साधतो की वाचकांना वाचताना आपण तुकोबांचाच अभंग वाचत असल्याचा भास होतो. केवळ शब्दांचा फेरफार आहे आणि शेवटच्या चरणात 'तुका म्हणे' ऐवजी 'रामदास भावे सांगतसे' एवढाच बदल आहे. म्हणजे कल्याणस्वामी यांनी सांगितलेला रामदासाचा हा अभंग तुकोबांच्या पुढील अभंगाची हुबेहूब नक्कल आहे. तुकोबांचा मूळ अभंग पुढीलप्रमाणे-
अर्थेवीण पाठांतर कासया करावे । व्यर्थचि मरावे घोकुनिया ।।
घोकुनिया काय वेगी अर्थ पाहे । अर्थरूप राहे होऊनिया ।।
तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी । नाहीतरी गोष्टी बोलो नका ।।
वरील दोन्ही अभंग नजरेखालून घातल्यानंतर कुणाच्याही सहजपणे लक्षात येईल की रामदासावर तुकोबांच्या साहित्याचा प्रचंड प्रभाव होता. अर्थात तुकोबांचे कार्यच एवढे मोठे होते आणि त्यांचा नावलौकिक एवढा मोठा होता की तुकोबांच्या प्रभावापासून कुणीही स्वतःला रोखू शकले नाहीत. अगदी रामदास सुद्धा तुकोबांच्या प्रभावाखाली होते हे रामदासांच्या वरील अभांगावरून लक्षात आलेच असेल. तुकोबांचा रामदासावर जो प्रभाव पडला त्यासंदर्भात डॉ सदानंद मोरे लिहितात, "प्रत्यक्षात तुकोबांचा समकालीन अनेकांवर व रामदासांवरही परिणाम झालेला असताना पारंपरिक व अर्वाचीन सांप्रदायिकांनी उलटापालट करून रामदासांना तुकोबांचेही गुरु ठरवण्याचा घाट घातला. तशा आख्यायिका निर्माण केल्या."
याचा अर्थ स्पष्ट आहे की तुकोबांनी शिवरायांना रामदासकडे पाठवले ही एक लोणकढी थाप आहे. तुकोबांना स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होती. ते त्यांच्या हयातीतच प्रसिद्धीस पावले होते. देहू आणि कोल्हापूर एवढे अंतर असतानाही बहिणाबाई पाठकांनी कोल्हापुरात तुकोबांबद्दल ऐकले. बहिणाबाई यांच्यासमवेत इतरही बऱ्याच उच्चवर्णीय लोकांनी स्वतःला तुकोबांचे अनुयायी म्हणून घेतले. रामदासंचा वरील अभंग पाहूनही खात्री पटते की रामदासाने सुद्धा तुकोबांपासून प्रेरणा घेतली होती. तेव्हा आजच्या रामदास भक्तांनी रामदासांना ओढून ताणून तुकोबा-शिवरायांपेक्षा मोठे दाखवण्यापेक्षा रामदासांची जेवढी उंची आहे तेवढीच ती दाखवावी. उगाच त्यांची तुलना तुकोबा किंवा शिवराय यांच्याशी करू नये. खुद्द रामदासांना सुद्धा त्यांची तुकोबांसोबत केलेली तुलना आवडणार नाही हे त्यांच्या वरील अभंगातूनच स्पष्ट होते. कारण ते स्वतः तुकोबांच्या प्रभावाखाली होते.
एवढे सर्व असूनही तुकोबांच्या साहित्यात अवघ्या मानव जातीला कवेत घेण्याचे आणि सर्व मानवांना समान मानण्याचे जे सामर्थ्य होते दुर्दैवाने ते रामदासांना साधले नाही आणि त्यांचे साहित्य हे केवळ एकाच जातीच्या वर्चस्वासाठी निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येते हे खेदाने नमूद करावे लागते.
[ लेख ]
@ डॉ. बालाजी जाधव, औरंगाबाद
मो. ९४२२५२८२९०
0 Comments