पेनूरचा पेट्रोलपंप भरदिवसा चालकाने करून टाकला बंद ; पंप चालकावर कारवाई करण्याची मागणी
मोहोळ/ प्रतिनिधी - संचारबंदी लागू झाल्यामुळे शासनाचा आदेश असल्याचे सांगत मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील पेट्रोल पंप चालकांचा मनमानी कारभार सुरू झाला आहे. कोरोना सारख्या भयंकर रोगाच्या साथीत आपत्कालीन परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची पेट्रोल पंप बंद केल्यामुळे गैरसोय होऊ लागली आहे. त्यामध्ये जवळपास वीस किलोमीटर पर्यंत कुठे पेट्रोल पंप नसल्यामुळे कामे करायची तरी कशी असा सवाल आरोग्य सेवक, बँक कर्मचारी, यांसह आपत्कालीन सेवा देणाऱ्या नागरिकातून निर्माण होऊ लागले आहेत त्यामुळे सदर पेट्रोल पंप चालकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पेनूरमध्ये दूध व्यवसाय करणाऱ्या आबा डोके या तरुणाला शुक्रवारी रात्री अचानकपणे सर्दी, घसा दुखीचा त्रास सुरु झाला. त्यामुळे तो दुचाकीने उपचारासाठी मोहोळला जात असताना पेनूर येथील गजानन पेट्रोलपंपावर पेट्रोल टाकण्यासाठी गेला होता. त्यावेळी उपचारासाठी जात असल्याचे सांगून देखील त्यास पेट्रोल दिले गेले नाही. त्यामुळे सदर युवकाने त्यास २५ मार्च रोजी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिलेला "जा.क्र.-मशा/कार्या-४/ जिनिक/ प्र.क्र.- आरआर- २९७/२०२०" या आदेश दाखवला असता, त्याने तुझी मोटारसायकल आहे, चारचाकी अथवा मोठे वाहन नाही. त्यामुळे तुला पेट्रोल देणार नाही, पेट्रोल पाहिजे असेल तर महसुल विभागाचे पत्र आण म्हणून हाकलून लावले.
कोन्हेरी येथील राजेंद्र माने हे दूध वहनाचे दुचाकीवर काम करतात. दूध डेयरी कडून पेट्रोल द्यावे अशा परवानगीचे शिक्का व सहिसह पत्र होते मात्र हे पत्र टाइपिंग करून का आणले नाही म्हणून त्यांना गजानन पेट्रोल पंपावर पेट्रोल दिले नाही.आम्ही आपत्कालीन परिस्थितीत सेवा पुरवायच्या तर कशा अशी खिन्न सुरात पेट्रोल मिळेल या आशेवर ते थांबले होते.ज्यांचा व्यवसाय आहे, त्या लोकांना महसूल विभागाने पास दिले आहेत. संचारबंदी काळात रात्रीच्या वेळी अचानक शारीरीक त्रास सुरु झाला तर ग्रामीण भागातील नागरीकांनी कागदपत्रे शोधायची का अधिकारी हा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे पेनूरमधील सामान्य नागरीकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
आपत्कालीन काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेट्रोल मिळणार की नाही याबाबत पंप चालकाला फोन केल्यावर त्याचा भ्रमणध्वनी बंद होता. तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करण्याचा फुकटचा सल्ला आपत्कालीन परिस्थितीत दिला.तदनंतर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचा देखील बराच वेळ फोन चालू असल्याने संपर्क होऊ शकला नाही यावरून मोहोळ तालुक्यातील प्रशासन कोरोना सारख्या जीवघेण्या आजारावर किती गंभीर आहे हे दिसत आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मागायचा तरी नेमका कोणाकडे...? हा प्रश्न निर्माण होतो
0 Comments