Hot Posts

6/recent/ticker-posts

“विषमता आणि बेरोजगार यापासून मुक्ती म्हणजे देशभक्ती” - प्रा. अजित अभ्यंकर

“विषमता आणि बेरोजगार यापासून मुक्ती म्हणजे देशभक्ती” - प्रा. अजित अभ्यंकर   


  
सोलापूर दि. १९ :- आज भारतात सर्वत्र रोजगारासाठी हाहाकार माजलेला आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेतून मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षित तरुणाईचे लोंढे बाहेर पडत आहेत. या तरुणाईमध्ये रोजगार मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे. गुणवत्ता, पात्रता आणि योग्यता असणाऱ्या हजारातून एकाला रोजगाराची संधी मिळत आहे. हि विषमता आणि बेरोजगारी देशाच्या आर्थिक अरिष्टाचे द्योतक आहे. यातून अर्थातच विषमता आणि बेरोजगारापासून मुक्ती म्हणजे खरी देशभक्ती असे मत मार्क्सवादी विचारवंत, ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले. 
       रविवार दि. १९ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजता दत्त नगर येथील सिटू कार्यालयात कामगार-शेतकरी-शेतमजूर भातृभाव दिनाचे औचित्य साधून सिटूच्यावतीने प्रा. अजित अभ्यंकर लिखित बंद करा सट्टाबाजार, बंद करा भावनांचा व्यापार “अबकी बार सिर्फ रोजगार” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते करण्यात आले. 
ते बोलताना पुढे म्हणाले कि, जगाच्या पाठीवर या घटिकेला वयवर्ष १५ ते २९ वयोगटातील तरुणांची संख्या सगळ्यात मोठी आहे. या दृष्टीने मनुष्यबळ, श्रमशक्ती, बौद्धिकता, उत्पादकतेची उपलब्धता आहे. परंतु याचा वास्तवात वापर होत नाही. म्हणून देशात २५ टक्के बेरोजगारी अर्थातच देशातील दर ४ युवकांत एक बेरोजगारीचे प्रमाण आहे. याला इथली शिक्षण व्यवस्था कारणीभूत आहे. खाजगी शिक्षण सम्राटांनी शिक्षणाच्या दर्जाची धूळधाण केली. 
जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी नागरी सुविधा उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे. याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. यासाठी सुशिक्षित रोजगाराची गरज व तसेच लोक शिक्षणाची गरज आहे. नव्या कल्पना घेऊन देशाला विकासाकडे घेऊन जाऊ शकतो. सरकारने कौशल्य विकास राबवले. परंतु इष्टांक गाठता आले नाही. अवास्तव ध्येय साध्य करण्यासाठी कसरत केली मात्र ते फोल ठरले. 
बेरोजगारीवर मात करण्यासाठी उपाय योजना सांगताना त्यांनी स्पष्ट केले कि, ज्या सट्टाबाजारामुळे भारतीय अर्थव्यवस्था कोलमडू लागली त्या सट्टाबाजारावर अधिकृतपणे १ टक्का कर लावले असता दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना २०० दिवस दररोज ७०० रुपये प्रमाणे वेतन मिळू शकते. याशिवाय पेन्शन व आरोग्य विमा सुद्धा देण्याची व्यवस्था होऊ शकते. लोकांच्या बचतीचा गैर वापर व मृत गुंतवणूक या सट्टाबाजारामुळे होत आहे. तसेच समाजाचे आर्थिक नुकसानही होत आहे अशी टीका त्यांनी केली. 
सुरुवातीस प्रास्ताविक सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच.शेख यांनी भातृभाव दिनाचे महत्व व आगामी कार्यक्रम विषद केले. त्यानंतर किसान सभेचे राष्ट्रीय नेते कॉ. सिद्धप्पा कलशेट्टी, सिटू राज्य सचिव कॉ. वसंत पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. 
अध्यक्षीय भाषणात माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी युवकांच्या रोजगारासाठी आता सरकारशी दोन हात करा असे म्हणाले.                                                                                                          
या प्रसंगी व्यासपीठावर कॉ. नलिनीताई कलबुर्गी, नसीमा शेख, शेवंताताई देशमुख, सुनंदाताई बल्ला, व्यंकटेश कोंगारी, युसुफ शेख (मेजर), सलीम मुल्ला, नगरसेविका कामिनिताई आडम, कुर्मय्या म्हेत्रे, शकुंतला पाणीभाते, रंगप्पा मरेड्डी, लिंगव्वा सोलापुरे आदि उपस्थित होते. 
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन कॉ. अनिल वासम यांनी केले. 
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिटू, डी.वाय.एफ.आय., एस.एफ.आय., जनवादी महिला संघटना, गृहनिर्माण संस्थांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments