अकलूज परिसरात 1 कोटी 80 लाखाची विकासकामे प्रगतीपथावर- शिवतेजसिंह
अकलूज -अकलूजच्या विकासासाठी विविध योजनेअंतर्गत 1 कोटी 80 लाखांची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. शिवाय वारंवार गाव बंद ठेवण्याबाबत अकलूज परिसरातील सर्व व्यापारी व गाळेधारकांची बैठक 4 फेब्रुवारीला आयोजित केली असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ग्रामसभेत ते बोलत होते.यावेळी उपसरपंच धनंजय देशमुख, ज्येष्ठ सदस्य किशोरसिंह माने-पाटील, ज्योतीदेवी माने-पाटील, संताराम सोनवणे, राहुल जगताप, आदित्य आर्वे, जादेव बागवान, सुभद्रा वाईकर, कविता काशिद, माजी सदस्य दादा तांबोळी, ग्रामविकास अधिकारी मुंगूसकर व नागरीक उपस्थित होते. यावेळी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी अकलूज परिसरातील झोपडपट्टट्या काढून 850 घरांचे पुनर्वसन केल्याबद्दल तसेच अकलूज मधील मंडई येथे महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण व सावित्री बाई फुले यांचा पुतळा बसवल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव दलित महासंघाचे अध्यक्ष राजू खिलारे यांनी मांडला त्यास सर्वानुमते संमती देण्यात आली. तसेच माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या खासदार निधीतून विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे उभारण्यात आलेल्या ध्वज स्तम्भाला तिरंगा झेंडा उपलब्ध करून दिल्या बद्दल शिवपार्वती विकास सेवा ट्रस्ट व शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी मांडण्यात आला. प्रारंभी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामसभेची सुरूवात राष्ट्रगीताने झाल्यानंतर अकलूज परिसरातील मयत झालेल्यांना नागरीकांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. पुढे बोलताना शिवतेजसिंह म्हणाले, ग्रामसभा हे समस्या मांडण्याचे उत्तम मांध्यम असून जास्तीत जास्त नागरीकांनी यात सहभाग घेणे गरजेचे आहे. अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर करण्याबाबतची प्रशासकीय प्रकिया अंतीम टप्प्यात आली असून लवकरच ती पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गावातील झोपडपट्ट्या उठवून तेथील घरांचे पुनर्वसन करण्याच्या महत्वकांक्षी योजनेला चांगले यश मिळाले असून त्या अंतर्गत सुमारे 850 घरांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. हा आकडा 1000 पर्यंत नेण्याचा आमचा संकल्प असून या माध्यमातून अकलूज झोपडपट्टी मुक्त करण्याकडे वाटचाल चालू असल्याचेही त्यांनी सांगितले. नुकत्याच उद्घाटन करण्यात आलेल्या मच्छी मार्केट मधील गाळ्यांचा लिलाव 2 तारखेला करण्यात येणार असून वारंवार काही ना काही कारणे देऊन अकलूज बंद होण्या संदर्भात अकलूजमधील सर्व व्यापारी व गाळेधारकांची बैठक 4 तारखेला आयोजित करण्यात आली असल्याचे शिवतेजसिंह यांनी सांगितले. अकलूज ग्रामपंचायतीच्या खोट्या बातम्या प्रसिध्द करण्यांवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. ज्येष्ठ सदस्य किशोरसिंह माने-पाटील यांनी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या अभिनंदनाच्या ठरावास पाठिंबा दिला. यावेळी आरोग्य सेविकांनी कुष्टरागाबाबत माहिती देऊन कुष्टरोगाच्या समुळ उच्छाटनासाठी गावकर्यांना प्रतिज्ञा दिली. उत्पादक शुल्क विभागाचे मस्करे यांनी ग्राम रक्षक दलाची स्थापना करण्याबाबतचे निवेदन दिले. सुत्रसंचालक व विषय वाचन माणिक इंगोले यांनी केले तर आभार राहुल जगताप यांनी मानले.

0 Comments