अगबाई अरेच्च्या
हैद्राबादेत' गोलंदाजांचे एन्काऊंटर
एरवी शांत शहर म्हणून ओळखले जाणारे हैद्राबाद शहर सध्या काही अप्रिय घटनांनी प्रकाशझोतात आलेले आहे. खऱ्याखुऱ्या एन्काऊंटर प्रकरणाची *शाई वळते न वळते* तोच राजीव गांधी मैदानावर प्रकाशझोतात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी ट्वेंटीत फलंदाजांनी गोलंदाजांची अक्षरशः कत्तल करत सामन्यात अधिराज्य गाजवले. अर्थातच विंडीज तर्फे एविन लुईस, शिमरॉन हेटमायर आणि कायरान पोलार्ड तर टीम इंडियाकडून के.एल. राहुल, विराट कोहली एन्काऊंटर स्पेशालिस्ट ठरले. हा सामना जरी विंडीज विरूद्ध भारत असा रंगला असला तरी विंडीजच्या "वायग्रा" फलंदाजीला भारतीय फलंदाजांनी कलात्मक, मनगटी आणि उत्कृष्ट टायमींगच्या भरवश्यावर मात करत सामना आपल्या नावे केला. दोन्हीकडच्या गोलंदाजांना या सामन्यात *उठता लाथ बसता बुक्की* असा बेदम मार बसला असून *अगले जन्म मुझे गेंदबाज ना करियो* अशीच प्रार्थना ते बहुतेक देवाजवळ करत असतील असे वाटते.
झाले काय तर विराटने नाणेफेक जिंकून विंडीजला फलंदाजीला पाचारण केले. वास्तविकत: दवबिंदूच्या बागुलबुव्यामुळे जरी हा निर्णय घेण्यात आला असला तरी विंडीजची टी ट्वेंटीतली कामगिरी आणि त्यांची पॉवर हिटींग पाहता हा निर्णय म्हणजे *आ बैल मुझे मार* असाच होता. त्यातच सपाट, उसळीच्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी *कुणी आखुडटप्पा घ्या, कुणी वाईड घ्या* अशी गोलंदाजी करत पाहुण्या विंडीजच्या मानापमानात काही कमतरता भासू दिली नाही. जेव्हा गोलंदाजच उदार झाले असतील तर क्षेत्ररक्षकसुद्धा कसे मागे राहतील? शिवाय आऊटफिल्डमध्ये विशेषतः सिमारेषेजवळ आपल्या क्षेत्ररक्षकांनी अनौपचारिकरित्या *नो कॅचिंग झोन* घोषित केल्याने विंडीजच्या धावसंख्येने डबल सेंच्युरी गाठली नसती तर ते जगातले आठवे आश्चर्य ठरलें असते.
विंडीजने २०७ धावा जरी केलेल्या असलेल्या तरी टीम इंडियाकडे कोहलीसारखा विराट *चेस मास्टर* आणि आयपीएल चे बाळकडू कोळून प्यालेले केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि विस्फोटक रिषभ पंत दिमतीला होते. तर विंडीजकडे या फलंदाजांना वेसन घालणारा एकही खडूस किंवा मातब्बर गोलंदाज नव्हता. अखेर व्हायचे तेच झाले. *विकेटसाठी दाहीदिशा फिरवी आम्हा जगदिशा* अशी विंडीज गोलंदाजांची गत झाली. त्यातच विंडीजच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला *रिटर्न गिफ्ट* च्या नावाखाली तब्बल २३ अवांतर धावा दिल्या. सोबतच १७ चेंडू जास्त टाकण्याची दानतही दाखवली.
या सामन्यात एकुण ४० षटकात ४०० च्या वर धावा कुटण्यात आल्या. विंडीजतर्फे ११ चौकार आणि १५ षटकारांची बरसात करण्यात आली तर भारतीय फलंदाजांनी १२ चौकार आणि तितकेच षटकार खेचत *क्रिकेट प्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले.* विंडीजतर्फे एविन लुईस, ब्रॅंडन किंग आणि शिमरॉन हेटमायरसहित कायरान पोलार्डने फलंदाजीत किल्ला लढवता तर टीम इंडीयाकडून केएल राहुल आणि विराटने २०० च्या वर धावांचे शिवधनुष्य लिलया पेलले. दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी टुकार गोलंदाजी करत आत्मघात करून घेतला. अर्थातच उर्वरित दोन सामन्यांत दोन्ही संघांनी गोलंदाजीवर विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर *गोलंदाजांनी रडवले, फलंदाजांनी हसवले* असे म्हणण्याची वेळ कोणत्याही संघावर येऊ शकते.
0 Comments