अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे रूग्णांचा अत्यल्प प्रतिसाद- मोहिते-पाटील
अकलुज( प्रतिनिधी)अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे रूग्णांचा अत्यल्प प्रतिसाद असल्याचे मत शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांनी अकलूज उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या महाआरोग्य शिबिर प्रसंगी व्यक्त करीत अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणाला कडाडुन विरोध केला. यामुळे खडबडून जागे झालेल्या अधिकाऱ्यांना कर्तव्याची जाणीव तर झालीच परंतु भविष्यात योग्य नियोजन करण्याचाही मानस त्यांनी आत्मसात केला.
युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे निमित्त अकलूज येथील उपजिल्हा रूग्णालयामध्ये महाआरोग्य
शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन जेष्ठ नेते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबीरामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभार्थी रूग्णांवर आवश्यक शस्त्रक्रिया व उपचार पुर्णपणे मोफत केले जाणार आहेत. हृदयरोग, कर्करोग किडनी विकार, पोटाचे आजार मेंदु रोग, स्त्री रोग, अस्थीरोग, कर्णविकार आदी
आजारांवर रूग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.
याप्रसंगी हेमलता चांडोले, धनंजय देशमुख, सुनंदा फुले यांच्यासह डॉ. मुकूंद जामदार, डॉ.
अंजली कदम, डॉ. शहा, डॉ. खडतरे, डॉ. प्रविण शिंदे, डॉ. एकतपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. शिबीरामध्ये अकलूज क्रिटीकेअर हॉस्पिटल, डॉ. कदम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. देवडीकर हॉस्पिटल यांनी सहभाग घेतला होता.
पुढे बोलताना धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, शासन नेहमीच चांगल्या योजना राबवते. परंतु अधिकारी त्याची
अंमलबजावणी व्यवस्थित करत नाहीत. शिबीर घेण्याविषयी सोलापूर येथे १५ दिवसांपुर्वी अधिकारी पातळीवर बैठक झाल्याचे समजते. परंतू अकलूज उपजिल्हा रूग्णालयाला मात्र तिन दिवसांपुर्वी कळवण्यात आले. या तिन दिवसांमध्ये अकलूज रूग्णालयाने तयारी कशी करायची. संपुर्ण तालूकाभर रूग्णांपर्यंत शिबीराचा संदेश कसा पोहोचवायचा, यंत्रणा कशी राबवायची.
या सर्व गोष्टींचा फटका मात्र गरीब व गरजू रूग्णांना बसतो. यामुळे याविषयीची तक्रारी वरिष्ठ पातळीवर करणार असल्याचेही ते म्हणाले.

No comments:
Post a Comment