कुस्ती पैलवानांशी होते, अशांशी नाही पवारांनी मुख्यमंत्र्यांना हाणला टोला.. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, October 13, 2019

कुस्ती पैलवानांशी होते, अशांशी नाही पवारांनी मुख्यमंत्र्यांना हाणला टोला..

बार्शी (प्रतिनिधी)ः आमच्यासोबत कुस्ती खेळायला कुणीच नाही, असे वारंवार सांगत टीका करणार्‍या मुख्यमर्ंत्यांचा शनिवारी बार्शीतील जाहीरसभेत खा.शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. कुस्ती ही पैलवानांसोबत होते अशांसोबत होत नाही, असे सांगताना त्यांनी हातवारे केल्यामुळे दोन दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राज्यात बेरोजगारी, कारखानदारी, उद्योगधंद्याची होत असलेली वाताहत, चुकीच्या धोरणांमुळेच शेतकर्‍यांच्या होत असलेल्या आत्महत्या असे अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना त्यांना बगल देऊन सत्ताधारी नेत्यांचा कलम ३७० रद्द केल्याचा जप सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक करू, असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्यांनी धोका दिला, फसवणूक केली. लोकांचे प्रश्न, अडीअडचणी सोडविण्यासाठी दिलेल्या सत्तेचा गैरवापर करणार्‍यांना या निवडणुकीत सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादीतून पक्षांतर केलेल्या सोपलांवरही त्यांनी नामोल्लेख न करता अप्रत्यक्ष शरसंधान साधले.
ते म्हणाले, ज्यांना पक्षाने ताकद दिली, मंत्रिपदे दिली अशांनी थोडीबहुत परिस्थिती बदलली की रस्ता बदलला. परंतु ज्या बार्शीकरांनी मोठे केले त्यांना विसरलेल्यांना जागा दाखवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारार्थ येथील गांधी पुतळ्याजवळ आयोजित सभेत ते बोलत होते. खा. पवार यांनी आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात भाजप-शिवसेनेच्या धोरणावर तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
खा. पवार म्हणाले, राज्याच्या राजकारणात बदल करायचा आहे. म्हणून राज्याच्या कानाकोपर्‍यात जाऊन जनतेशी संवाद साधतोय. नवीन तरुण वर्ग हजारोंच्या संख्येने राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा द्यायला एकत्र येतोय. या निवडणुकीत भाजप-सेनेचे नेते राज्यभर हिंडताहेत. ते म्हणताहेत येथे लढाईच नाही. जर लढाई नाही तर मग केंद्रीय गृहमंत्री व मुख्यमंत्री राज्यात सर्वत्र सभा घेत का फिरत आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नाव घेऊन सत्तेवर आलेल्यांनी बाबासाहेबांचे स्मारक केले नाही. शिवरायांच्या विचाराने सरकार चालविणार, परंपरा जतन करणार असे सांगितले अन् किल्ले पर्यटनासाठी खुले करायचा ठराव केला. सरकारने फसवणूक केली हे लोकांना समजले आहे.
दुष्काळ, अतिवृष्टी अशा निसर्गाच्या लहरीपणाबरोबरच सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी संकटात सापडला. यंदा या राजवटीत १६ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. आपण देशाचे कृषिमंत्री असताना पंतप्रधान मनमोहनसिंह यांना सांगून ७० हजार कोटींची सरसकट कर्जमाफी देऊन शेतकर्‍यांना हात दिल्याची आठवण करून दिली.
बेरोजगारांच्या हातांना काम मिळावे यासाठी उद्योगपूरक धोरण राबवले. या सरकारच्या काळात अनेक उद्योग बंद पडले. त्यामुळे अनेकांना नोकर्‍या गमावाव्या लागल्या. असे असताना विद्यमान सत्ताधारी मते मागत फिरत आहेत. बेकारांचे तांडे निर्माण करायला, कामगारांच्या चुली विझवायला यांना मते द्यायची काय, असा प्रश्न त्यांनी विचारला. मुख्यमंत्र्यांचे गाव असलेल्या उपराजधानीत गुन्हेगारी वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. महिलांवर अत्याचार करणार्‍यांना पाठीशी घातले जात असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेने १० रुपयांत जेवण देण्याबाबत केलेल्या घोषणेचीही त्यांनी खिल्ली उडविली. यावेळी शलाका मरोड, जीवन आरगडे, विक्रम सावळे, महेबूब शेख यांनीही भूमकर यांना साथ देण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर जि.प.चे माजी अध्यक्ष बळीराम साठे, माजी आमदार राजन पाटील, उमेश पाटील, राष्ट्रवादीचे उमेदवार निरंजन भूमकर, तेजस्विनी मरोड, विकास पाटील, राजकुमार पौळ आदी उपस्थित होते.
अमित शहा यांचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ३७० चा जप सुरू आहे. लोक अडचणी, समस्या सांगत आहेत आणि हे ३७० सांगत आहेत. काश्मीरमधले ३७० रद्द केले. आनंद आहे. त्याला पाठिंबा. पण राज्यघटनेत ३७१ सुध्दा कलम आहे. ३७१ मध्ये नागालँड, मणिपूर, सिक्कीम, मेघालय वगैरे ९ राज्यांत तुम्हाला आम्हाला जमीन घ्यायचा अधिकार नाही. काश्मीरमधले ३७० रद्द केले त्याला पाठिंबा, पण ३७१ का नाहीत बदलत ? असा प्रश्न उपस्थित करत, फक्त फसवणूक करायचे सुरू आहे.
पक्षांतर करून जे गेले, ते बार्शीचा विकास करायचा म्हणून गेल्याचे समजले. एवढ्या दिवस तिकिटं दिली, निवडून दिलं, मंत्रिपद दिले तेव्हा काय केलं? असे विचारत आता म्हणताहेत की विकास करायचाय. विधिमंडळात, राज्यात अनेकांना शक्ती देऊन मोठे करायचा प्रयत्न आम्ही केला. ही शक्ती समर्थपणाने या भागाचे प्रतिनिधीत्व करावे म्हणून दिली. थोडीबहुत परिस्थिती बदलली की माणसं दुसरा रस्ता बघतात. परंतु बार्शीकर पळपुटी भूमिका घेणार्‍यांना त्यांची जागा दाखवतात हा माझा ५० वर्षांचा अनुभव आहे. आज ज्या बार्शीकरांनी मोठं केले, ज्यांनी शक्ती दिली त्यांच्याशी शब्दाला न जागणारा भूमिका घेणारा कोणी असेल त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय तुम्ही राहणार नाही, अशी साद त्यांनी बार्शीकरांना घातली. सोपलांचे नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages