विद्यापीठाकडून नवी संधी; कुलगुरू डॉ. फडणवीस यांची माहिती*बीए, बीकॉमच्या विद्यार्थ्यांनी घेतले 'एमएस्सी'साठी प्रवेश!*
सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पदवीधरांसाठी एक अनोखी संधी उपलब्ध करून देण्यात आली असून याअंतर्गत बीए आणि बीकॉम झालेल्या विद्यार्थ्यांना थेट एमएस्सीची पदवी घेता येणार आहे. यंदाच्या वर्षी संपूर्ण देशात प्रथमच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या या नव्या विद्याशाखा बदल अभ्यासक्रमासाठी पाच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
दहावी झाल्यानंतर कोणत्या शाखेतून करिअर करावे, याविषयी अनेक विद्यार्थी व पालकांच्या मनात संभ्रम असतो. यावेळी काही विद्यार्थी कला, वाणिज्य व शास्त्र तसेच तंत्रशिक्षणचा पर्याय निवडून करिअरला सुरुवात करतात. अकरावी, बारावी झाल्यानंतर पुढे बीए, बीकॉमची पदवी घेतल्यानंतर काही विद्यार्थ्यांना एमएस्सीची पदवी संपादन करावी, अशी वाटते. मात्र आतापर्यंत आपल्याकडे अशी पद्धत नव्हती. शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांना कला व वाणिज्य शाखेतून पुढे करिअर करता येते. पण कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना शास्त्र शाखेतून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळत नसतो. त्यामुळे आता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून बीए, बीकॉम झालेल्या विद्यार्थ्यांना एमकॉम व एमएस्सी करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अनेक विद्यार्थी इंग्रजी विषयातून बीएच्या पदवीचे शिक्षण पूर्ण करतात. त्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन एमएस्सीतून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेऊन करिअर करावयाचे असते, मात्र तशी संधी त्यांना नसते. त्यामुळे आता विद्यापीठाकडून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तशी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर बीकॉम झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना एमएस्सी संख्याशस्त्रातून पदवी संपादन करायची असते. तीही संधी आतापर्यंत उपलब्ध नव्हती, याचबरोबर बीएच्या विद्यार्थ्यांनाही आता बीकॉम करता येणार आहे.
पायाभूत अभ्यासक्रमाच्या कोर्सनंतर प्रवेश
बीए, बीकॉमच्या विद्यार्थ्यांना एमएस्सीतून पदवी घेण्यासाठी एक महिना कालावधीचा फाउंडेशन कोर्स अर्थात पायाभूत अभ्यासक्रमाचे शिक्षण घ्यावे लागले. त्यामध्ये विद्यापीठाच्या तज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एमएस्सीसाठी प्रवेश देण्यात आला आहे. यंदा पहिल्या वर्षी अकरा विद्यार्थ्यांनी यासाठी परीक्षा दिली होती. त्यात सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर पाच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
विद्यार्थ्यांकडून नव्या संधीचे स्वागत
विद्याशाखा बदल अभ्यासक्रम उपक्रमाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले असून या नव्या संधीमुळे बीए, बीकॉमची पदवी घेऊन एमएस्सी करण्याचा आनंद काही औरच असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हंटले आहे. बीए केलेला सागर पुजारी याने एमएस्सी मॅथेमॅटिक्सला प्रवेश घेतला आहे. बीकॉम करून आकाश चटके आणि बीएस्सी फिजिक्स करून वसुंधरा देशमुख यांनीही एमएस्सी मॅथेमॅटिक्सला प्रवेश घेतला आहे. गीतांजली शिंदे आणि धनंजय चोपडे यांनी बीए करून कम्प्युटर सायन्सला प्रवेश घेतला आहे.
0 Comments