सोलापूर -: राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यासाठी ऐतिहासिक २५ किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट, हॉटेल उभारण्यासाठी देण्याबाबतचा शासनाचा ३ सप्टेंबर २०१९ चा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी राष्ट्रीय छावाचे जिल्हाध्यक्ष योगेश पवार यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री व पर्यटनमंत्री यांचेकडे केली आहे.
गड-किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय तातडीने मागे घ्या - छावा
याबाबत सविस्तर हकीकत अशी की., एमटीडीसी दीर्घकालीन महसूल मिळवण्यासाठी हे किल्ले ६० ते ९० वर्षांसाठी करारावर देणार असून या किल्ल्यांवर फक्त हॉटेलच नाही तर विवाहस्थळ आणि मनोरंजन कार्यक्रमांची जागा म्हणूनही विकसित करण्याचा एमटीडीसीचा प्रयत्न चालू आहे. या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत आहे. त्यामुळे भाजपा शासन पुरुस्कृत एमटीडीसीने जर महाराष्ट्रातील गड-किल्ले करारावर देण्याचा निर्णय तातडीने मागे घेतला नाही आणि गड-किल्ल्यांचे जागतिक मानकांनुसार संवर्धन केले नाहीतर राज्याचे मुख्य सचिव व पर्यटन सचिव यांच्या दालनात राष्ट्रीय छावा संघटनेच्यावतीने साप सोडून, संबंधित सचिवांना काळे फासण्याचा इशारा योगेश पवार यांनी दिला आहे.
तसेच सरकारला जर पैश्याची इतकीच भीक लागली असेल तर त्यांनी उत्पन्न वाढीसाठी बॉलीवूड कलाकार आणि भारतातील सुप्रसिध्द गायिका अमृताताई फडणवीस यांचा स्टेज शोचा कार्यक्रम घ्यावा आणि त्यातून राज्याचा महसूल वाढवावा किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांनी अंबानी सारख्या एखाद्या मोठ्या उद्योगपतीला महाराष्ट्र सरकार भाड्याने चालविण्यासाठी देवून महसूल वाढवावा, असे निवेदनात म्हटले आहे.
तसेच शासनाने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा दैदिप्यमान इतिहासाचा बाजार मांडून छत्रपतीचे गड-किल्ले भाड्याने देवून भाडखाऊपणा केला तर संबंधित सचिवांच्या तोंड काळे फासून त्यांचा बाजार उलथवून टाकण्याचा इशारा योगेश पवार यांनी दिला आहे.
0 Comments