Hot Posts

6/recent/ticker-posts

नवीन पायंडा

काही दिवसांपूर्वी एका संस्थेच्या अहवालात कोट्यधीश असलेले अनेक खासदार या राज्यसभेत असल्याचे समोर आले होते. कोट्यधीश असूनही जनतेसाठी आपले हात मोकळे करण्यात ते कमी पडतात, परंतु भारतरत्न सचिन तेंडुलकर त्याहून वेगळे आहेत, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. नेहमी मितभाषी आणि नम्र असलेल्या सचिन यांनी समाजसेवा करताना कुठेही गवगवा होणार नाही, याची आतापर्यंत काळजी घेतली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला साथ देत खेडी दत्तक घेतली आहेतच, परंतु अनेक अनाथ बालकांचा ते सहारा बनले आहेत. परंतु, आता त्यांनी आपण इतरांपेक्षा वेगळे कसे आहोत हे दाखवून दिले आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात मिळालेले मानधन आणि इतर भत्ते मिळून ९० लाखांपेक्षा जास्त रक्कम पंतप्रधान मदत कोषासाठी दिली आहे. कदाचित ही रक्कम सचिनसाठी छोटी असू शकते, परंतु दान देण्याची वृत्ती आजही त्यांनी जोपासली हे महत्त्वाचे. शिवाय, त्या रकमेतून कितीतरी जणांना मदत मिळू शकणार आहे, हेही तितकेच खरे. मानवतेचे दर्शन सचिन यांच्या अनेक कृतीतून झाले आहे.
सचिन तेंडुलकर हे राज्यसभेत निवड झाल्यापासून फारसे बोलले नाहीत, अशी ओरड होती. सचिन यांनी जितका वेळ द्यायला हवा होता तितका ते देऊ शकले नसतील कदाचित, परंतु त्यांनी ज्या दिवशी बोलण्याची तयारी केली तेव्हा राज्यसभेचे कामकाजच बंद पाडले गेले, त्यामुळे त्यांना आपले भाषण सोशल मीडियातून करावे लागले! सचिन खेळाडू म्हणून श्रेष्ठच आहेत, परंतु माणूस म्हणूनही ते श्रेष्ठ असल्याचे त्यांच्या समाजसेवेतून दिसून आले आहे. आज राजकीय लोकांच्या प्रतिमा डागाळलेल्या आहेत. अशावेळी सचिनसारख्या व्यक्तीने आपल्या हक्काची रक्कम सोडणे अनेकांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे. कारण आज याच राज्यसभेत अनेक अब्जाधीश खासदार आहेत, त्यांनीही सचिन यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर देशाला सेवा पुरवली तर त्याचे स्वागतच करायला हवे. भ्रष्टाचारामुळे आज अनेक नेते बदनाम होत आहेत आणि त्यामुळे जनतेतही नेते म्हणजे भ्रष्टाचारी अशीच भावना निर्माण झाली आहे. ही प्रतिमा दुरुस्त करण्याचे काम सचिन यांच्या कृतीने झाले आहे.
 क्रिकेटपटू सचिन ज्या प्रकारे अनेक युवांना प्रेरणास्थान बनले आहेत तसेच राजकारणात ते अनेकांसाठी प्रेरणास्रोत बनू शकतील, अशी आशा आहे. सचिन यांच्यासारखे हजार लोक उभे राहिले तर समाज परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. खरे तर आज संपन्न लोकांनी पुढे येऊन जे मागासलेले आहेत, त्यांना हात देण्याची गरज आहे. सचिन यांनी आपल्या कृतीतून ते अनेकदा दाखवून दिले आहे. सचिन यांनी आपल्याला मिळणार्‍या खासदार निधीचाही जास्तीत जास्त उपयोग केला आहे, हे विशेष. कारण अनेक खासदार त्याचा योग्य उपयोग करत नाहीत, असा अनुभव आहे. सचिन यांनी खेडी दत्तक घेऊन आणि त्यांचे वेतन आणि भत्ते पंतप्रधान मदत कोषासाठी देऊन नवीन पायंडा घातला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments