
सोलापूर (प्रतिनिधी)ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने सामाजिक न्यायासह सर्व समाजाचे हित साधले जाणार आहे. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना सोबत घेऊन जाण्याच्या दृष्टीकानोतून शासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वांनी आचरणात आणण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी शिंदे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहणे म्हणून पोलिस आयुक्त महादेव तांबडे उपस्थित होते. कार्यक्रमास महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, समाजकल्याण सभापती शीला शिवशरण, सहायक पोलिस आयुक्त महावीर सकळे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमित घवले, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी विजय लोंढे आदी उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य मासिकाच्या ‘महामानवाला अभिवादन’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लोकराज्य मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंबंधित लेखांचा सर्वांना चांगला उपयोग होईल, डॉ. आंबेडकरांचा वैचारिक दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी लोकराज्य विशेषांक सर्वांनी वाचावा, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत वसतिगृहाचे अनुदान मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. सुभाष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर किशोर जाधव यांनी आभार मानले.
0 Comments