माढा (प्रतिनिधी)ः महाराष्ट्रात सध्या शेतकरी आत्महत्या, बलात्कार, खून, विनयभंग,पोलीसांकडून तरुणांची व आपल्या सहकारी महिला अधिकार्यांच्या हत्या घडत आहेत त्यामुळे कायद्याचे रक्षक असणारेच भक्षक झाल्यासारखे चित्र निर्माण झाल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तर खूपच गंभीर बनला असल्याची घणाघाती टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी करीत युतीच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या चौथ्या टप्प्यात टेंभुर्णी ता.माढा येथे आयोजित सभेत बोलत होते.
याप्रसंगी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे , खा.विजयसिंह मोहिते पाटील ,आमदार बबनदादा शिंदे, आ.जयदेव गायकवाड ,प्रदेश महिला अध्यक्षा चित्राताई वाघ ,राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष दिपक साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह (भैय्या) शिंदे,अजिंक्यराणा पाटील, प्रदीप गारटकर, सभापती विक्रमसिंह शिंदे,पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, स्व.यशवंतराव चव्हाण , स्व.वसंतदादा पाटील , देशाचे नेते तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी राज्याला दिशा देण्याचे काम केले.
महिलांना संधी देत त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
त्यानंतरच्या नेतेमंडळीनी राज्याला विकासाकडे नेण्यासाठी प्रयत्न केले अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वावलंबी बनविले ज्या ज्या वेळी शेतकरी संकटात सापडला त्या त्या वेळी त्याला दुष्काळी निधी, गारपीट निधी, पीक विमा यांच्या स्वरूपात मदत करण्याचा प्रयत्न केला उजनी धरण हे सोलापुर, अहमदनगर व पुणे या तीन जिल्ह्यातील शेतीसाठी महत्वाचे बनले आहे याबाबतीत खासदार शरदचंद्र पवारांची भूमिका महत्वाची ठरली आहे सध्याच्या सरकार स्वतः कांही करत नाही फक्त पोकळ आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करीत आहे.
उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन नाही यामुळे तुमच्या आमच्या हक्काचे पाणी कर्नाटकात वाहून गेले आहे.
सांगलीत अनिकेत कोथळेची पोलीसांनी हत्या केली तर पोलीस अधिकारी असलेल्या अश्विनी बेंद्रेची हत्या त्यांच्या सहका-यांनीच केली. पंढरपुरात एका नगरसेवकाची हत्या झाली. रेल्वे स्टेशन, बस स्टँड , शाळा व महाविद्यालये अशा गर्दीच्या ठिकाणी महिलांना सुरक्षिततेची हमी राहिली नाही.
अनेक ठिकाणी बलात्काराच्या व विनयभंगाच्या घटना सातत्याने घडत आहेत तेंव्हा या सरकारला केंव्हा जाग येणार आहे ? कोठे गेले स्वर्गीय आर.आर.पाटील यांच्या काळातील गृहखाते आणि अधिकारी व पोलिसांची शिस्त ? असा खडा सवाल त्यांनी उपस्थित करून गृहखात्याचा कारभार पाहणा-या मुख्यमंत्री महोदयांचा खरपूस समाचार घेतला.
0 Comments