सलमानने काळवीटाची शिकार केल्याची तक्रार १९९८मध्ये दाखल झाली; पण त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल होण्यासाठी तब्बल सात वर्षे लागली. त्यानंतर कनिष्ठ न्यायालय, जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालय यांमध्ये या आरोपांनीच आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करीत आणखी सात वर्षे हा खटला लांबविला गेला. अखेर सगळे मार्ग बंद झाल्यानंतर हा खटला चालला. मधल्या दोन दशकांत सलमानने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये प्रचंड नाव, पैसा आणि प्रतिष्ठाही कमाविली. यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे बॉलिवूडचा तो सर्वांत मोठा स्टार बनला. त्याचे चित्रपट म्हणजे किमान शंभर कोटींची कमाई असे समीकरण बनले. यामुळे त्याला प्रचंड लोकप्रियताही लाभली. प्रत्यक्ष जीवनात त्याने अनेकदा आक्षेपार्ह वर्तन केले. सहकारी अभिनेत्यांना धमकाविण्यापासून ते निर्मात्यांना सिनेजगतामध्ये टिकू द्यायचे की नाही याचा निर्णय घेण्यापर्यंतच्या गोष्टी तो करीत असल्याचा आरोप झाला. काही लोक तर या गोष्टी कौतुकाने सांगतात. वास्तविक गेली १९ वर्षे सलमान गुन्हेगार आहे. वन्यजीव कायदा मोडून त्याने काळवीटाची हत्या केली आहे, हे माहीत असतानाही त्याला डोक्यावर घेतले गेले. त्याचा अभिनय आणि त्याने केलेला गुन्हा या वेगळ्या गोष्टी असल्या, तरी समान न्यायाचे तत्त्व त्यालाही लागू पडते याची जाणीव ठेवायला हवी. त्याने खरोखरीच काळवीटाची शिकार केली होती का असा प्रश्न जाहीरपणे विचारणारे आजही आहेत. त्यांची तोंडे आता बंद होतील. सलमानवर बॉलिवूडने पाचशे कोटी रुपयांहून अधिक रक्कम लावली आहे, त्यांचे काय असे विचारून हे पैसे लावणाऱ्यांचा काय दोष आहे असेही आता विचारले जाईल. सलमान सुटणार असे गृहीत धरूनच पैसे लावले काय, असा प्रश्न यामुळे निर्माण होतो. सलमानला सुनावलेली शिक्षा जास्तच आहे असा सूर लावणाऱ्यांना खडे बोल ऐकवण्याची आवश्यकता आहे. या शिक्षेला सलमानकडून आव्हान दिले जाईल; तसेच त्यासाठी त्याला जामीनही कदाचित लगेच दिला जाईल. तो तुरुंगात राहिला, तरी संजय दत्तप्रमाणे फर्लो आणि बाकीच्या सोई सुविधा घेत बराच काळ बाहेरही राहील; पण हे सारे करताना तो शिक्षा झालेला गुन्हेगार असेल. शिक्षेमुळे सामान्य माणसाचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होईलच; पण हेच वेळेवर झाले असते तर त्याचा परिणाम अधिक झाला नसता काय, असा प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक आहे. शंभर गुन्हेगार सुटले तरीही चालतील; पण एकाही निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये या तत्त्वावर भारतातील न्यायदान चालते. पैसेवाली मंडळी त्याचा किती गैरफायदा घेतात हे ही या निमित्ताने पुन्हा सिद्ध झाले आहे. लोकांच्या मनावर अधिराज्य करीत त्यांच्या भावनांशी खेळ करणाऱ्यांवरील खटलेही अधिक वेगाने आणि प्रभावीपणे चालविले गेले पाहिजेत. सलमानला १९ वर्षांनंतर का होईना, शिक्षा झाली यामध्ये आनंद मानण्यापेक्षा ही शिक्षा सुनावण्यासाठी एवढा वेळ का लागला आणि तो योग्य होता का याची चर्चा या निमित्ताने तरी व्हायला हवी.
 |
Add caption |
0 Comments