VVPIET मध्ये AICTE-ATAL प्रायोजित सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम उत्साहात संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विद्या विकास प्रतिष्ठानच्या व्ही. व्ही. पी. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोलापूर येथे ए. आय. सी. टी. इ.- अटल (अकॅडमी) प्रायोजित सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (FDP) चे आयोजन करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स– AI) तंत्रज्ञानाचा शैक्षणिक, संशोधनात्मक आणि व्यावसायिक क्षेत्रात नैतिक व जबाबदार पद्धतीने वापर करण्याबाबत प्राध्यापकांना मार्गदर्शन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
सहा दिवस चाललेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात दररोज दोन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील प्रख्यात अभियांत्रिकी महाविद्यालयातून व इंडस्ट्रीमधून आलेल्या तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. सुरजीत देबनाथ ( असोसिएट प्रोफेसर, गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, त्रिपुरा), डॉ. बी आर राजकुमार ( डायरेक्टर ,स्किलडक्स प्रायव्हेट लिमिटेड), या तज्ञ मार्गदर्शकांनी AI च्या विविध साधनांचा (AI टूल्स) प्रभावी, नाविन्यपूर्ण आणि नैतिक वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यापन-अध्ययन प्रक्रिया अधिक परिणामकारक बनविणे, शैक्षणिक साहित्य निर्मिती, संशोधन, माहिती विश्लेषण, प्रकल्प विकास तसेच दैनंदिन शैक्षणिक कामकाजात AI साधनांचा उपयोग कसा करता येईल, याचे प्रात्यक्षिकांसह विवेचन करण्यात आले.
या FDP दरम्यान AI च्या वापरातील नैतिक मूल्ये, माहितीची अचूकता व विश्वसनीयता, डेटा गोपनीयता, बौद्धिक संपदा हक्क, साहित्यचौर्य (Plagiarism), AI-निर्मित माहितीची पडताळणी आणि जबाबदार डिजिटल वर्तन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर विशेष भर देण्यात आला. तंत्रज्ञानाचा वापर करताना मानवी विचारक्षमता, सर्जनशीलता आणि शैक्षणिक प्रामाणिकता जपण्याचे महत्त्व तज्ज्ञांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमामुळे सहभागी प्राध्यापकांना आधुनिक AI साधनांची ओळख होण्यासोबतच त्यांचा अध्यापन, संशोधन आणि शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी योग्य पद्धतीने वापर करण्याचे व्यावहारिक ज्ञान प्राप्त झाले. देशभरातील विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या एफ.डी.पी साठी 59 संशोधक व प्राध्यापक सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष अमोल (नाना) चव्हाण, संस्थापक चेअरमन प्रा. डॉ. जी. के. देशमुख, उपाध्यक्ष एम. एल. कटकधोंड, प्राचार्य प्रा. डॉ. अरुण गायकवाड, सह समन्वयक प्रा. अमिर वागदरीकर, प्रा. भवानी मॅडम, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व आयोजन समिती सदस्य यांनी विशेष सहकार्य केले. अशा उपक्रमांमुळे अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना नैतिक मूल्यांची जपणूक करण्यास निश्चितच प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

No comments:
Post a Comment