विद्यार्थ्यांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित; जिल्हा परिषद शाळेत मिठाई व फराळाचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 5, 2026

विद्यार्थ्यांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित; जिल्हा परिषद शाळेत मिठाई व फराळाचे वाटप

विद्यार्थ्यांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित; जिल्हा परिषद शाळेत मिठाई व फराळाचे वाटप

मा. सरपंच सौ. दीपिकाताई क्षीरसागर यांच्या पुढाकारातून सामाजिक बांधिलकीचा अनोखा उपक्रम



भिगवण (कटूसत्य वृत्त):-   दिवाळी हा आनंद, उत्साह, प्रेम आणि आपुलकीचा सण. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सणाचा आनंद पोहोचावा, विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उदात्त हेतूने भिगवण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मिठाई व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. भिगवणच्या माजी सरपंच सौ. दीपिकाताई तुषार क्षीरसागर यांच्या वतीने आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची दिवाळी अधिक गोड झाली.

दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांसोबत सणाचा आनंद साजरा करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अचानक मिळालेल्या या गोड भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होत दीपिकाताई क्षीरसागर यांनी त्यांच्याशी संवाद साधत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना दीपिकाताई क्षीरसागर म्हणाल्या की, शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणारे संस्काराचे केंद्र आहे. दिवाळीचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो विद्यार्थ्यांसोबत वाटून घेणे हेदेखील महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी, प्रोत्साहनासाठी तसेच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात सण-उत्सव केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता समाजातील लहान मुलांसोबत आनंद वाटून घेणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच प्रेम, आपुलकी आणि सामाजिक जाणिवेचे महत्त्व समजावे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य मेघनाताई बंडगर, डॉ. प्रशांत चवरे, दादा थोरात, जावेद शेख, अमृता गायकवाड, सीमा काळंगे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आप्पासाहेब गायकवाड, अँड. सुरज खुटके, अमर घुडवे, प्रसाद क्षीरसागर, संतोष सवाने, संजय हगारे, शाहाजी गाडे, पप्पू भोंग, कपिल लांडगे, राजेंद्र हगारे, संजय शिंदे, सचिन शेलार, निलेश मोरे, सागर जगदाळे, संतोष गायकवाड, अरुण भाई, सागर शिंदे, डॉ. जयश्री गांधी, मुमताज शेख, तृप्ती उंडाळे, सारिका सवाने , औदुंबर हुलगे, असलम मुलाणी, गौरव पों दकुले, नवनाथ सावंत, राजू सोनवणे आदींनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. तुषार क्षीरसागर यांनी केले, तर सूत्रसंचालन सचिन गायकवाड यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडवणारा ठरला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages