सत्तेत भाजप, तरीही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे! गोकुळमध्ये मात्र लोकशाहीचा गळा आवळता; राज ठाकरेंचा भाजपवर घणाघात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 6, 2026

सत्तेत भाजप, तरीही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे! गोकुळमध्ये मात्र लोकशाहीचा गळा आवळता; राज ठाकरेंचा भाजपवर घणाघात

सत्तेत भाजप, तरीही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे! गोकुळमध्ये मात्र लोकशाहीचा गळा आवळता; राज ठाकरेंचा भाजपवर घणाघात





मुंबई (कटूसत्य वृत्त):-  भारतीय जनता पक्षाच्या राजकीय भूमिकेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका करत भाजपच्या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेतला आहे. देशापासून राज्यापर्यंत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत सत्तेत असलेला भाजप लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढत आहे, हे जगातील एकमेव उदाहरण असावे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. विशेषतः कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सत्तासंघर्षाचा संदर्भ देत त्यांनी भाजपच्या लोकशाहीविषयक भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.


राज ठाकरे यांनी गोकुळमधील संचालकांच्या निवडीचा मुद्दा उपस्थित करत भाजपला थेट सवाल केला. गोकुळच्या निवडणुकीत भाजपच्या पॅनलचे १२, तर सतेज पाटील यांच्या पॅनलचे १३ संचालक निवडून आले. ही निवडणूक बॅलेट पेपरद्वारे आणि लोकशाही मार्गाने झाली असताना भाजपला बहुमत मिळाले नाही म्हणून सरकारकडून पाच संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याची गरज का भासली? हा प्रकार नेमका कोणती लोकशाही सिद्ध करतो, असा सवाल त्यांनी केला.


लोकशाहीची खरोखरच बूज राखायची असेल, तर निवडणुकीत जनतेने दिलेला कौल स्वीकारण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी दाखवली पाहिजे. गोकुळमध्ये सत्ता मिळवता आली नाही म्हणून तत्त्वे बाजूला ठेवायची आणि दुसरीकडे लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढायचे, ही भूमिका म्हणजे राजकीय दुटप्पीपणाच असल्याची टीका ठाकरे यांनी केली.


महाराष्ट्रात सध्या पाण्याचा भीषण दुष्काळ असताना भारतीय जनता पक्षात मात्र समजूतदारपणाचा दुष्काळ पडल्याचे चित्र दिसत आहे, अशी बोचरी टिप्पणीही त्यांनी केली. सत्तेत असताना लोकशाही वाचवण्याच्या घोषणा द्यायच्या आणि दुसरीकडे स्वतःच लोकशाहीचा गळा आवळायचा, अशी भाजपची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला.


इतकेच नव्हे, तर देशातील अतिरेकी हल्ले, कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न तसेच अर्थव्यवस्थेची स्थिती यावरूनही भाजपवर त्यांनी निशाणा साधला. देशात अशा समस्या निर्माण झाल्या की, त्यावर आत्मपरीक्षण करण्याऐवजी भाजपने देश वाचवा, दहशतवादापासून देश वाचवा आणि अर्थव्यवस्था वाचवा, असे मोर्चे काढावेत का, असा उपरोधिक सवाल त्यांनी उपस्थित केला.


बहुमत मिळाले की लोकशाही, पराभव झाला की मोर्चे?


भाजपने रडीचा डाव खेळणे बंद करावे, असा स्पष्ट इशारा देताना ठाकरे म्हणाले की, कुठल्याही मार्गाने भाजपने मिळवलेले बहुमत विरोधी पक्षांनी गेली १२ वर्षे सहन केले आहे. मात्र आता देशातील जनता विरोधी पक्षांकडे झुकू लागली असेल, तर भाजपनेही जनतेचा बदलता कौल सहन करण्याची आणि लोकशाही प्रक्रियेचा आदर करण्याची सवय लावून घेतली पाहिजे.


सत्तेचा लाभ घेताना लोकशाहीचे तत्त्व विसरायचे आणि विरोधात निकाल लागला की लोकशाहीच्या नावाने गळा काढायचा, या भाजपच्या भूमिकेवर राज ठाकरे यांनी केलेला हा हल्लाबोल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages