ओंकार शुगरकडून जिल्ह्यात सर्वाधिक ऊसदराची घोषणा; आठ दिवसांत ऊसबिलांची देयके — शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण
इंदापूर (कटूसत्य वृत्त):-अंकुश भोसले इंदापूर (बिजवडी): यंदाच्या गळीत हंगामात कर्मयोगी सहकारी साखर कारखाना महात्मा फुले नगर (बिजवडी)तसेच सहयोगी ओंकार शुगर अॅन्ड डिस्टिलरी पॉवर प्रा. लि. यांच्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत सर्वाधिक ऊसदर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, कारखान्याला ऊसपुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे.
याप्रसंगी ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “शेतकऱ्यांचा घाम आणि मेहनत याला योग्य मोबदला मिळणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे. सर्व अडचणींवर मात करत, कारखान्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यंदा आपण जिल्ह्यात सर्वाधिक ऊसदर देण्याचे नियोजन केले आहे.”
*वेळेवर देयकांवर भर*
बोत्रे-पाटील यांनी असेही स्पष्ट केले की, ओंकार शुगरने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. उसाचे वजन, बिलिंग आणि एफआरपी (FRP) वेळेवर अदा करण्याची शिस्तबद्ध परंपरा कारखान्याकडे कायम राहिली आहे. यंदाही शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक फटका बसू न देता, योग्य व उच्चांकी भाव वेळेत मिळवून दिला जाईल.
यंदाच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांच्या ऊसबिलाची रक्कम तसेच ऊस वाहतूकदारांची देयके आठ दिवसांत त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार असल्याची ग्वाही बोत्रे-पाटील यांनी दिली. यामुळे ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांसह वाहतूकदारांनाही दिलासा मिळाला आहे.
*शेतकऱ्यांना आवाहन*
जिल्ह्यातील जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कर्मयोगी सहकारी साखर कारखाना व ओंकार शुगरलाच पुरवावा, असे आवाहन बोत्रे-पाटील यांनी केले. शेतकऱ्यांनी ऊसाचे वजन कोठेही करून ओंकार शुगरच्या कोणत्याही युनिटला ऊस पुरवठा करू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मागील गळीत हंगामात ओंकार शुगरने प्रतिटन ३,१५० रुपये दर जाहीर केला होता. त्यापैकी ३,०५० रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले होते, तर उर्वरित १०० रुपयांचा हप्ता दिवाळीपूर्वी देण्यात येणार होता. यंदाही याच उच्चांकी दराची परंपरा कायम ठेवण्याचा कारखान्याचा निर्धार असल्याचे बोत्रे-पाटील यांनी सांगितले.
*शेतकऱ्यांचा प्रतिसाद*
कारखान्याच्या या घोषणेनंतर स्थानिक ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि वाहतूकदारांनी कारखाना प्रशासनाचे तसेच बाबुराव बोत्रे-पाटील यांचे आभार मानले आहेत. वेळेवर देयके, पारदर्शक वजनकाटा आणि उच्चांकी दर यामुळे यंदाच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांचा ओंकार शुगरकडे ऊसपुरवठा वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment