भिगवण पोलिसांचा वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना दणका! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 2, 2026

भिगवण पोलिसांचा वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना दणका!

 भिगवण पोलिसांचा वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना दणका!

मॉडिफाइड सायलेन्सर, विनानंबर प्लेट वाहनांसह नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर धडक कारवाई;
 ६० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल


भिगवण (कटूसत्य वृत्त):-   भिगवण शहरासह परिसरातील रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी भिगवण पोलीस स्टेशनच्या वतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष धडक मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले असून, पोलिसांनी विविध प्रकारच्या नियमभंगांवर कठोर कारवाई केली आहे.

ऑक्टोबर २०२६ या महिन्यात राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान मॉडिफाइड सायलेन्सरचा वापर करणाऱ्या वाहनचालकांविरोधात तब्बल २२ केसेस दाखल करण्यात आल्या. संबंधित वाहनांवरील नियमबाह्य सायलेन्सर जप्त करून त्यांच्यावर नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली. याशिवाय प्रेशर हॉर्न, मोठ्या आवाजात ध्वनिप्रदूषण करणारी वाहने तसेच वाहतुकीच्या नियमांना हरताळ फासणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.

विशेषतः शहरात तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवर विनानंबर प्लेट वाहने चालविणे, वाहनांमध्ये नियमबाह्य बदल करणे, मॉडिफाइड सायलेन्सर बसवून मोठ्या आवाजात वाहन चालविणे अशा प्रकारांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शाळा, महाविद्यालये आणि गर्दीच्या ठिकाणी अशा वाहनांमुळे ध्वनिप्रदूषण वाढून अपघातांचा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर भिगवण पोलिसांनी अशा वाहनचालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. या मोहिमेत विविध नियमभंगांबद्दल एकूण ६० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दरम्यान, भिगवण पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व वाहनचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा, मद्यपान करून वाहन चालवू नये, वाहनांमध्ये नियमबाह्य मॉडिफाइड सायलेन्सर बसवू नयेत, ट्रॅक्टर व ट्रॉलीला आवश्यक रिफ्लेक्टर लावावेत, तसेच वाहनांमध्ये मोठ्या आवाजाचे प्रेशर हॉर्न वापरून ध्वनिप्रदूषण करू नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. केवळ दंडात्मक कारवाई करणे हा या मोहिमेचा उद्देश नसून, नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि रस्त्यांवरील सुरक्षितता वाढविणे हा या मोहिमेमागील मुख्य हेतू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम

ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक मा. संदीप सिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग पुणे ग्रामीण मा. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग मा. चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

तसेच भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार गणेश कर्वे, ड्रायव्हर पोलीस अंमलदार शंकर भोसले, पोलीस अंमलदार समीर झांबरे, रंजीत मुळीक तसेच महिला पोलीस अंमलदार भांग यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका. सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन करा, असे आवाहन भिगवण पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages