नेताजी प्रशालेच्या विठ्ठल कुंभार यांना गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेतील क्रीडा शिक्षक विठ्ठल अण्णप्पा कुंभार यांना यंदाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्य शासनाच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२५-२६ साठी राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकांची यादी शुक्रवारी प्रसिद्ध झाली. त्यात सोलापूरच्या नेताजी प्रशालेतील क्रीडा शिक्षक विठ्ठल कुंभार यांची पुणे विभागातून एकमेव गुणवंत क्रीडा शिक्षक म्हणून निवड झाली आहे.
येत्या ३ डिसेंबर रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
शासनाच्यावतीने समाजाची निःस्वार्थ भावनेने व निष्ठेने सेवा करणाऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्याच्या तसेच त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने आदर्श व गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात.
विठ्ठल कुंभार हे सोलापूर शहर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे शहर अध्यक्ष असून ड्रॉप रो बॉल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आहेत. तसेच सोलापूर रोल बॉल असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. गेल्या एकवीस वर्षांपासून क्रीडा क्षेत्राच्या चळवळीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत हजारो खेळाडूंनी शहर, जिल्हा, विभागीय, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर मजल मारली आहे. विविध खेळांच्या पंच परीक्षा उत्तीर्ण असून ते राज्यस्तरीय पंच म्हणून काम पाहतात. स्काऊट मास्टर तसेच आर.एस.पी. शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. विविध वर्तमानपत्रांतून खेळासंबंधी लेख लिहिले असून दहा क्रीडा पुस्तकांचे लेखन केले आहे. आतापर्यंत विविध संस्थांकडून त्यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत.
सोलापूर शहर जिल्ह्यातून एकमेव क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याने शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:
Post a Comment