सत्तेचा दबदबा, मतपेटीत विरोधाचा दणका!
जिल्हा बँक निवडणुकीत सहकार विकास पॅनलची एकहाती सत्ता
मंगळवेढा, दक्षिण सोलापुरात मोहिते-पाटील पॅनेलची मुसंडी
उत्तर सोलापूर, माढ्यात क्रॉस व्होटिंगचा धडाका
जयकुमार गोरेंची फिल्डिंग, तरी मतपेटीत अदृश्य शक्तीचा दणका!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप प्रणित सहकार विकास पॅनेलने १९ पैकी १८ जागा जिंकत ऐतिहासिक सत्ता मिळवली असली, तरी तालुकानिहाय मतांची आकडेवारी भाजपसाठी आत्मपरीक्षणाचा इशारा देणारी ठरली आहे. विशेषतः मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूरमध्ये सत्ताधारी भाजपच्या नेत्यांचा भरणा, राजकीय ताकद आणि स्थानिक सत्तेची समीकरणे असतानाही मोहिते-पाटील प्रणित स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनेलला मिळालेली मते भाजपच्या वर्चस्वाला छेद देणारी ठरली आहेत. उत्तर सोलापूर आणि माढ्यातही काही मतदारसंघांत झालेल्या क्रॉस व्होटिंगने निवडणुकीतील राजकीय गणिते उघडी पाडली आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने १९ पैकी १० जागा आधीच बिनविरोध जिंकल्या होत्या. उर्वरित नऊ जागांसाठी झालेल्या मतदानातही सहकार विकास पॅनेलने आठ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले. मात्र, या विजयाच्या आकड्यांपलीकडे तालुकानिहाय मतदानाचे चित्र पाहिले, तर काही ठिकाणी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला मतदारांनी अपेक्षित साथ दिलेली नाही. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावून शेवटपर्यंत राजकीय फिल्डिंग लावली असतानाही काही मतदारसंघांत विरोधी पॅनेलला मिळालेल्या मतांनी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मंगळवेढ्यात सत्तेच्या ताकदीला मतपेटीतून आव्हान!
मंगळवेढा तालुक्यात आमदारापासून स्थानिक संचालक आणि सत्तास्थानांपर्यंत भाजपची मजबूत पकड असतानाही विरोधी पॅनेलने मतांच्या आकडेवारीत प्रभावी कामगिरी केली. महिला मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना एकत्रित ४२ मते मिळाली, तर विरोधी उमेदवारांना १७५ मते मिळाली. अनुसूचित जाती मतदारसंघात भाजपला १८, तर विरोधी उमेदवाराला ९६ मते मिळाली. भटक्या-विमुक्त मतदारसंघातही भाजपला १५, तर विरोधकांना ९९ मते मिळाली.
पणन मतदारसंघात रणजितसिंह शिंदे यांना आघाडी मिळाली असली, तरी दूध संस्था आणि नागरी बँकांच्या मतदारसंघातही विरोधी उमेदवाराला मताधिक्य मिळाले. मंगळवेढ्यात भाजपची स्थानिक राजकीय ताकद असूनही मतदारांनी काही मतदारसंघांत विरोधी पॅनेलला दिलेला कौल हा राजकीय समीकरणांना धक्का देणारा ठरला आहे.
दक्षिण सोलापुरात नेत्यांची ताकद, मतदारांचा वेगळा कौल!
दक्षिण सोलापूर तालुक्यातही भाजपच्या सत्तास्थानांची मजबूत उपस्थिती असताना मतदानाच्या आकडेवारीने वेगळे चित्र समोर आणले. महिला मतदारसंघात भाजप उमेदवारांना एकत्रित ४३ मते, तर मोहिते-पाटील पॅनेलच्या उमेदवारांना १२५ मते मिळाली. अनुसूचित जाती मतदारसंघात भाजपला ३२, तर विरोधकांना ६६ मते मिळाली. भटक्या-विमुक्त जाती-जमाती मतदारसंघात भाजपला ३५, तर विरोधी उमेदवारांना ६३ मते मिळाली.
रणजित शिंदे आणि साळुंखे यांना या मतदारसंघात सर्वच मते मिळाली, तर बँक व पतसंस्था मतदारसंघात दोन्ही बाजूंना समसमान मते पडली. दक्षिण सोलापूरमध्ये राजकीय नेत्यांचा मोठा भरणा असूनही विरोधी पॅनेलने काही मतदारसंघांत घेतलेली आघाडी भाजपच्या स्थानिक राजकारणासाठी चर्चेचा विषय बनली आहे.
उत्तर सोलापूर, माढ्यात क्रॉस व्होटिंगचे संकेत!
उत्तर सोलापूरमध्ये महिला मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना १०७ आणि १२६ मते, तर विरोधी उमेदवारांना ९२ आणि ८४ मते मिळाली. अनुसूचित जाती-जमाती आणि भटक्या-विमुक्त मतदारसंघांत भाजपला तुलनेने आघाडी मिळाली. मात्र, बँक व पतसंस्था मतदारसंघात भाजपला ६६, तर विरोधी उमेदवाराला ९७ मते मिळाल्याने मतदानातील फूट स्पष्ट झाली.
माढ्यात महिला मतदारसंघात भाजप उमेदवारांना १६७ आणि १७६ मते, तर मोहिते-पाटील पॅनेलच्या उमेदवारांना ११९ आणि १३९ मते मिळाली. अनुसूचित जाती, भटक्या-विमुक्त जाती-जमाती, दूध संस्था आणि नागरी बँकांच्या मतदारसंघांत भाजपला तुलनेने आघाडी मिळाली. मात्र, पणन मतदारसंघात भाजपला १८, तर विरोधकांना एकही मत मिळाले नाही.
१८ जागांचा विजय; पण मतांच्या गणिताने दिले संकेत!
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप प्रणित सहकार विकास पॅनेलने १८ जागांवर विजय मिळवून सहकार क्षेत्रात ऐतिहासिक वर्चस्व निर्माण केले. एक जागा अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनेलच्या माध्यमातून जिंकली. अंतिम टप्प्यातील एका जागेवर भाजपचे मनीष देशमुख यांनी अमोल शिंदे यांचा पराभव करत भाजपचे संख्याबळ १८ वर नेले.
केंद्रापासून राज्यापर्यंत, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेचे पाठबळ असतानाही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काही तालुक्यांतील मतदारांनी दिलेला वेगळा कौल भाजपच्या राजकीय रणनीतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. विजयाचा आकडा मोठा असला, तरी मतपेटीतून उमटलेले स्थानिक नाराजीचे संकेत आणि क्रॉस व्होटिंगचे गणित आगामी राजकीय घडामोडींमध्ये निर्णायक ठरू शकते.
जिल्हा बँक निवडणुकीत सहकार विकास पॅनलची एकहाती सत्ता
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 19 संचालक मंडळ सदस्यांपैकी तब्बल 18 जागावर भाजप प्रणित पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहे.
तर एका जागेवर अर्जुनसिंह मोहिते पाटील हे स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या उमेदवाराला विजय मिळवता आलाय. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप प्रणित सहकार विकास पॅनलने मुसंडी मारत 9 पैकी 8 जागेवर भाजप प्रणित सहकार विकास पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला. तर अवघ्या एका जागेवर मोहिते पाटील प्रणित स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलला यश मिळवता आले.
शेवटच्या टप्प्यात फक्त एका जागेवर भाजप आणि मोहिते पाटील गटात मोठी चुरस पाहायला मिळाली. मात्र त्यातही भाजपचे उमेदवार मनीष देशमुख यांनी अमोल शिंदे यांचा पराभव करत भाजपची एकहाती सत्ता राखली.
.jpg)
No comments:
Post a Comment