सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 2, 2026

सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

 सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करणारा सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगाव, सोलापूर येथील वार्षिक क्रीडा महोत्सव ३१ ऑक्टोबर रोजी उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांसह पालकांनीही विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने मैदानावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. एस. एच. पवार (संचालक, सीआरटीडी, सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर  संजय नवले उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला.

या महोत्सवात पूर्वप्राथमिक विभागापासून कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वयोगटानुसार विविध मैदानी खेळ, मनोरंजक स्पर्धा आणि क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या क्रीडागुणांचे प्रदर्शन केले.


महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मनोरंजक क्रीडा स्पर्धा. महिला व पुरुष पालकांनी मोठ्या उत्साहाने विविध खेळांमध्ये सहभाग घेतला. पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांचा जल्लोष यामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. या उपक्रमातून शाळा आणि पालक यांच्यातील सुसंवाद व सहकार्याचे दर्शन घडले.

यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. एस. एच. पवार यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील खेळांचे महत्त्व स्पष्ट करताना, क्रीडेमुळे शारीरिक व मानसिक विकासासोबतच शिस्त, संयम, निर्णयक्षमता आणि संघभावना विकसित होते, असे सांगितले.

सन्माननीय अतिथी  संजय नवले यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही प्रगती करण्याचे आवाहन केले. विजयाइतकेच सहभाग, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि खिलाडूवृत्ती महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचे तसेच सहभागी खेळाडूंचे मान्यवरांनी कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्या सौ. शाहीन शेख, उपप्राचार्य श्री. प्रकाश नवले, उपप्राचार्या सौ. निकहत शेख, क्रीडा शिक्षक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मयूरी भोसले व कु. पलक मीणा यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages