ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक शिक्षण पोहोचविण्यास शासन प्रयत्नशील – मंत्री आदिती तटकरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 4, 2026

ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक शिक्षण पोहोचविण्यास शासन प्रयत्नशील – मंत्री आदिती तटकरे

 

ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक शिक्षण पोहोचविण्यास शासन प्रयत्नशील – मंत्री आदिती तटकरे





मुंबई(कटूसत्य वृत्त):-   डिजिटलायझेशनच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणातील वापर वाढत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शहरी भागासह ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत जागतिक दर्जाचे आधुनिक शिक्षण पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या समान संधी मिळण्यासाठी जागतिक स्तरावरील अभ्यासक्रम भारतीय भाषांमध्ये अनुवादित करून सोप्या स्वरूपात उपलब्ध करण्याबाबत विचार होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

अंधेरी येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात ‘एज्युकेशन ग्रोथ नेटवर्क’च्या दोन दिवसीय ‘एज्युकेशन कनेक्ट एक्स्पो’चे उद्घाटन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी एज्युकेशन ग्रोथ च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉली सिंग उपस्थित होत्या. शिक्षण क्षेत्रातील नव्या संकल्पना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शैक्षणिक विकासाच्या विविध पैलूंवर या उपक्रमात विचारमंथन होत आहे. या चर्चासत्रातून पुढे येणाऱ्या सूचना आणि निष्कर्षांचा राज्याच्या प्रस्तावित बालधोरणात समावेश करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की,  विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणेही महत्वाचे आहे. वाढती स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा आणि शैक्षणिक गुंतवणुकीमुळे मुलांवर येणारा मानसिक ताण लक्षात घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याची गरज आहे. सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये खासगी शाळांतील विद्यार्थ्यांपेक्षा आपण कमी नाही, हा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शाळांमधील पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर शासन भर देत आहे.

एज्युकेशन ग्रोथ नेटवर्क, शालेय शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभाग यांच्या समन्वयातून काही शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि उपक्रम राबविण्याबाबत शासन विचार करेल. पुढील पाच वर्षांत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षणाच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे तसेच शासन आणि शिक्षण क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये समन्वय वाढविणे आवश्यक असल्याचे मंत्री तटकरे यांनी नमूद केले.

डिजिटल शिक्षणासाठी शाळांमध्ये डिजिटल बोर्ड बसविण्याबरोबरच शिक्षकांना त्यांचा प्रभावी वापर करता यावा, यासाठी किमान दोन दिवसांचे (४८ तासांचे) प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांचे मानसिक आरोग्य आणि कल्याणही महत्वाचे आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाच्या अडचणींचा एकत्रित विचार करून त्या सोडविण्यात येणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.

प्रदर्शनात ६० ते ७० स्टॉल्स उभारण्यात आले होते. डिजिटल बोर्डद्वारे शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, शाश्वत विकासाशी संबंधित उपक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधने आणि सुविधांची माहिती या स्टॉल्सच्या माध्यमातून देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages