सामाजिक कार्याचा गौरव! राजन घाडगे यांना जिल्हास्तरीय समाजसेवक पुरस्कार; प्रिती घाडगे यांची अखिल भारतीय छावा संघटनेच्या मोहोळ तालुकाध्यक्षपदी निवड
मोहोळ(कटूसत्य वृत्त):- सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत समाजा प्रती आपली बांधिलकी जपणाऱ्या राजन घाडगे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने त्यांना यंदाचा ' जिल्हास्तरीय समाजसेवक पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा आणि समाजसेवेची तळमळ लक्षात घेऊन सौ. प्रिती घाडगे यांची अखिल भारतीय छावा संघटनेच्या मोहोळ तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय भैय्या घाडगे-पाटील यांच्या शुभहस्ते राजन घाडगे यांना सन्मानचिन्ह व पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी राज्य पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते प्रवीण घाडगे, जिल्हाध्यक्ष गीतांजली कदम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते.
राजन घाडगे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, समाजातील विविध घटकांसाठी दिलेले योगदान आणि समाज हितासाठी सातत्याने घेतलेला पुढाकार यांची विशेष दखल राज्यस्तरावर घेण्यात आली. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
दरम्यान, समाजसेवेची हीच प्रेरणा पुढे नेत सौ. प्रिती घाडगे यांच्यावर अखिल भारतीय छावा संघटनेच्या मोहोळ तालुकाध्यक्ष पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे मोहोळ तालुक्यात संघटनेचे कार्य अधिक जोमाने विस्तारेल, तसेच महिला नेतृत्वाला नवी संधी आणि बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
एका बाजूला सामाजिक कार्याचा जिल्हास्तरीय सन्मान, तर दुसऱ्या बाजूला संघटनेच्या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण जबाबदारी, असा दुहेरी गौरव घाडगे कुटुंबासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरला आहे.
राजन घाडगे यांच्या पुरस्काराबद्दल आणि सौ. प्रिती घाडगे यांच्या तालुकाध्यक्ष पदी झालेल्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी त्यांचे मोहोळ तालूक्यांतून व जिल्हाभरातून अभिनंदन केले जात आहे.

No comments:
Post a Comment