टेंभुर्णीतील मोफत अस्थिरोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सुमारे ६०० रुग्णांची तपासणी; गरजूंवर संचेती हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार व शस्त्रक्रिया
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संचेती हॉस्पिटल, पुणे, टेंभुर्णी येथील पाटील हॉस्पिटल व मार्श हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत अस्थिरोग व हाडांच्या तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात जवळपास ६०० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन माजी आमदार धनाजी साठे, आमदार संजयमामा शिंदे, आमदार अभिजीत पाटील तसेच हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. दर्शन सोनवणे, डॉ. प्रमोद भिलारे, डॉ. राहुल पाटील, डॉ. अमोल माने, डॉ. मदन कांबळे, भैया पाटील, शीलाताई पाटील, भाऊ महाडिक आदी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मणक्याचे विकार, मानदुखी, पाय व घोट्यांच्या समस्या तसेच हाडांशी संबंधित विविध आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच बोन मिनरल डेन्सिटी (BMD) तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे नागरिकांना आपल्या हाडांच्या आरोग्याबाबत आवश्यक माहिती मिळण्यास मदत झाली.
यावेळी बोलताना संचेती हॉस्पिटलचे चेअरमन व जागतिक कीर्तीचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. पराग संचेती यांनी सांगितले की, शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ज्यांना पुढील उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून संचेती हॉस्पिटल, पुणे तसेच टेंभुर्णीतील संबंधित हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध करून देण्यात येईल. गरजेनुसार पुढील उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. संचेती यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयांमध्ये संचेती हॉस्पिटलने सर्वप्रथम बोन बँक सुरू केली. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना रक्तपेढीतून रक्त उपलब्ध करून दिले जाते, त्याचप्रमाणे हाडांची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी बोन बँकेच्या माध्यमातून हाडे उपलब्ध करून देणे शक्य होते. हाडांची कमतरता भरून काढण्यासाठी बोन बँकेतील हाडे अत्यंत उपयुक्त ठरत असून, हाडांशी संबंधित गंभीर विकारांमुळे होणारे अपंगत्व कमी करण्यास तसेच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी होण्यास त्याचा मोठा फायदा होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिबिरासाठी पुणे येथून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती. तसेच टेंभुर्णीतील डॉ. राहुल पाटील, डॉ. अमोल माने व डॉ. मदन कांबळे यांनीही विशेष सहभाग नोंदवला. संचेती हॉस्पिटलच्या वतीने डॉ. आदित्य शहा, डॉ. अशोक जाधव, डॉ. पियुष दुसाने, डॉ. अथर्व देवकर, डॉ. प्रतीक तिवारी, डॉ. प्रयाग ममानिया तसेच हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर राहुल चोंबे, आदिनाथ रोठे, रोहित जठार, विशाल कराळे, शैलेश निमण यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास भविष्यातील अनेक शस्त्रक्रिया टाळता येऊ शकतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी हाडांच्या व सांध्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करून घ्यावेत. वेळेत केलेल्या उपचारांमुळे पुढील आयुष्य अधिक निरोगी व सुखकर होण्यास मदत होते, असा सल्ला डॉ. पराग संचेती यांनी दिला.

No comments:
Post a Comment