सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये पर्यावरणपूरक दीपावली उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 17, 2026

सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये पर्यावरणपूरक दीपावली उत्साहात साजरी

 सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये पर्यावरणपूरक दीपावली उत्साहात साजरी


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगाव येथे पर्यावरणपूरक दीपावली उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी आकर्षक किल्ल्यांची निर्मिती करून छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यशाली इतिहास आणि स्वराज्य स्थापनेचा गौरवशाली वारसा जिवंत केला. किल्ल्यांवरील तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार आणि मावळ्यांच्या प्रतिकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तसेच विद्यार्थ्यांनी आकर्षक रांगोळ्या साकारल्या. मातीच्या पणत्या सजविणे, आकाशकंदील तयार करणे आणि दीपप्रज्वलन अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.

या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कल्पकता, संघभावना आणि ऐतिहासिक वारशाविषयी आदर निर्माण होण्यास मदत झाली. पारंपरिक पद्धतीने दीपावली साजरी करत पर्यावरणपूरक सणाचा संदेशही विद्यार्थ्यांनी दिला.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, उपप्राचार्या निकहत शेख यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे दीपावली उत्सव आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages