कायदेशीर दत्तक प्रक्रियेतून बालकाला मिळाले हक्काचे घर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अनाथ, निराधार तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि हक्काचे कुटुंब मिळावे, यासाठी दत्तक विधानाची प्रक्रिया कायदेशीर मार्गाने पूर्ण करणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कायदेशीर दत्तक विधानाची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेद्वारे एका बालकाला हक्काचे घर मिळाले. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते बालक हस्तांतरण व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने दत्तक विधान प्रक्रियेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. दत्तक प्रक्रियेमध्ये बालकाचे सर्वोत्तम हित, सुरक्षितता आणि उज्ज्वल भविष्य यांना प्राधान्य दिले जाते. बालकाला कुटुंबाचा आधार, प्रेम आणि सुरक्षित वातावरण मिळावे, हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी इच्छुक दत्तक पालकांनी शासनाच्या अधिकृत केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाच्या (सीएआरए) माध्यमातून नोंदणी करून विहित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले. दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पात्र दाम्पत्यांनी तसेच नियमानुसार पात्र अविवाहित व्यक्तींनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे, गृहअभ्यास अहवालाची प्रक्रिया पूर्ण करणे, बालकाचे नियमानुसार संदर्भीकरण करून कायदेशीर दत्तक आदेशाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनधिकृत मार्गाने दत्तक प्रक्रिया करणे टाळावे. शासनाच्या अधिकृत यंत्रणेमार्फतच दत्तक प्रक्रिया पूर्ण करून बालकांना कायदेशीर संरक्षण आणि कुटुंबाचा आधार मिळवून द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या वेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अविनाश मगर, जिल्हा परिविक्षा अधिकारी वैशाली भोसले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन थोरात, चाइल्डलाइन समन्वयक आनंद ढेपे, समुपदेशक मल्लिनाथ तमशेट्टी, पर्यवेक्षक विश्वेश्वर वाघमारे, अनोज कदम, नवरंगे बालकाश्रमच्या अधीक्षक राजश्री गाडे तसेच दत्तक पालक उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment