एक सही संतापाची! मतदारांच्या संतापाला मनसेचा आवाज; बॅलेट पेपरसाठी सोलापूरात सह्यांची मोहीम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांचा विश्वास कायम राखण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) सोलापुरातील सोन्या मारुती चौक येथील मनसे कार्यालयात सह्यांची मोहीम राबविण्यात आली. ‘एक सही संतापाची, एक सही लोकशाही वाचविण्यासाठी!’ या घोषवाक्याखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह मतदानासाठी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी करण्यात आली.
या मोहिमेद्वारे एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, स्वच्छ व निष्पक्ष मतदार याद्या तयार कराव्यात आणि निवडणूक प्रक्रिया राबवताना सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घ्यावे, अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि पारदर्शकतेबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर संबंधित यंत्रणांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवणार
निवडणूक ही लोकशाहीचा आत्मा असून मतदारांचा विश्वास टिकविण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या शंका दूर करण्यासाठी पारदर्शक व्यवस्था आवश्यक आहे. जनतेच्या भावना आणि मागण्या संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही मोहीम आयोजित केल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मतदारांच्या प्रश्नांना उत्तरे मिळाली पाहिजेत आणि निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कायम राहिला पाहिजे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोहिमेत मनसेसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारीही सहभागी झाले होते.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, प्रशांत गिड्डे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, शिवसेनेचे महानगरप्रमुख महेश धाराशिवकर, मनविसे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिवसेनेचे सत्तार सय्यद, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद कुमठेकर, जिल्हा उपाध्यक्ष निलेश भंडारे, वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष जितेंद्र टेंभुर्णीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कुरेशी, शेरू कुरेशी, मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्ष जयश्री हिरेमठ, शोभाताई साठे, शहर उपाध्यक्ष अनिल भिसे, गणेश पाटील, आकाश निंबाळकर, अनिकेत उपासे, गणेश भोसले, समर्थ ओझा, द्वारकेश पटणे, अभिषेक इरकल, वैभव धोत्रे, सैफन जमखंडी, गोविंद बंदपट्टे, सोपान महिंद्रकर, आकाश राठोड, शफीक शेख आणि विनायक माढेकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment