‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानासाठी मंगळवेढ्यात तालुकास्तरीय प्रशिक्षण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 14, 2026

‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानासाठी मंगळवेढ्यात तालुकास्तरीय प्रशिक्षण

 ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानासाठी मंगळवेढ्यात तालुकास्तरीय प्रशिक्षण




 

मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम व संपन्न करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती मंगळवेढा येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणात विविध विभागांचे अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य पथकांनी सहभाग घेत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रशिक्षणास जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. सतीश कोपूरवाड, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. नांदकिशोर घाडगे आणि माता व बालसंगोपन अधिकारी मा. डॉ. हर्षल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी मंगळवेढा मा. डॉ. भाऊसाहेब जानकर व तालुकास्तरीय प्रशिक्षकांनी अभियानाचे उद्दिष्ट, कार्यपद्धती आणि अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन करुन प्रशिक्षण घेतले.

प्रशिक्षणादरम्यान गावातील आरोग्यविषयक समस्या ओळखणे, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा बळकट करणे, आरोग्यविषयक निर्देशांकांमध्ये सुधारणा घडवून आणणे तसेच ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभाग यांच्या समन्वयातून गावाचा सर्वांगीण आरोग्यविकास साधणे, या बाबींवर भर देण्यात आला. अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती व आरोग्य संस्थांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची माहितीही देण्यात आली.

तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या पथकांनी अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात गटचर्चा व कृती आराखड्यांचे सादरीकरण केले. गावपातळीवर नियोजन, आरोग्यविषयक उपक्रमांची अंमलबजावणी आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर यावेळी चर्चा झाली.

या प्रशिक्षणास गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक व सहायिका, आरोग्य सेवक व सेविका तसेच गटप्रवर्तक उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या सूचनांनुसार मंगळवेढा तालुक्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व पदाधिकारी, प्रतिनिधी, प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, नागरिक, तरुण मंडळे महिला बचत गट आणि शिक्षण, एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग व इतर विविध शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग घेऊन गाव आरोग्य संपन्न करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मा. डॉ. भाऊसाहेब जानकर तालुका आरोग्य अधिकारी मंगळवेढा यांनी  यावेळी केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages