पशुधनाच्या पाण्याच्या टँकरची संख्या वाढवा- आ. समाधान आवताडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 14, 2026

पशुधनाच्या पाण्याच्या टँकरची संख्या वाढवा- आ. समाधान आवताडे

 पशुधनाच्या पाण्याच्या टँकरची संख्या वाढवा- आ. समाधान आवताडे





पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनावरांची संख्या आणि त्यांच्या प्रत्यक्ष पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रति जनावर पिण्याच्या पाण्याचे प्रमाण लिटरमध्ये वाढवावे, तसेच त्यानुसार टँकरची संख्या वाढवून पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीची दखल घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

मतदारसंघातील गावांमध्ये पावसाअभावी पाणीटंचाई तीव्र झाली असून, त्याचा फटका नागरिकांसह पशुधनालाही बसत आहे. जनावरांची तहान भागविण्यासाठी पशुपालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दुष्काळामुळे चारा आणि पाण्याची व्यवस्था करताना पशुपालकांवरील आर्थिक भार वाढत असून, जनावरांचे संगोपन करणेही जिकिरीचे बनले आहे. या पार्श्वभूमीवर पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला आहे.
शासनाच्या सध्याच्या निकषांनुसार मोठ्या देशी जनावरांसाठी दररोज ३५ ते ४० लिटर, तर लहान जनावरांसाठी १० ते १५ लिटर पाणी गृहीत धरले जाते. संकरित गाईंसाठी दररोज १०० ते ११० लिटर, तर लहान संकरित गाईंसाठी ३५ ते ४० लिटर पाणी आवश्यक असते. मात्र, मतदारसंघातील गावांमधील पशुधनाची एकूण संख्या आणि जनावरांच्या प्रत्यक्ष पाण्याची गरज लक्षात घेता, सध्याच्या निकषांनुसार मंजूर होणारे पाणी अपुरे पडत असल्याचे आमदार आवताडे यांनी निवेदनात निदर्शनास आणून दिले आहे.

केवळ प्रचलित निकषांनुसार पाणी मंजूर करण्याऐवजी संबंधित गावातील पशुधनाची संख्या, जनावरांचा प्रकार आणि त्यांना दररोज लागणारे पाणी यांचा विचार करून प्रत्येक जनावरासाठी पिण्याच्या पाण्याचे प्रमाण लिटरमध्ये वाढवावे. त्यानुसार गावनिहाय पाण्याची गरज निश्चित करून आवश्यक तेवढे टँकर मंजूर करावेत, अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे. जनावरांच्या प्रत्यक्ष गरजेइतके पाणी उपलब्ध झाल्यास पशुधनाची तहान भागविण्यास मदत होईल, असेही त्यांनी निवेदनातून निदर्शनास आणून दिले आहे.
दुष्काळाच्या काळात पशुधनाचे संरक्षण होण्याबरोबरच पशुपालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. आमदार समाधान आवताडे यांनी केलेल्या मागणीची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दखल घेत संबंधित विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने, दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages