मोहोळ शहराच्या विकासासाठी १० कोटींच्या निधीची मागणी
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पालखी रोड स्टेशन या प्रमुख रस्त्याच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी तसेच शहरातील विविध विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोहोळ शहराच्या विकासकामांसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ठोस आदेश दिल्याची माहिती देण्यात आली.
शिवसेना ओबीसी महाराष्ट्र राज्य प्रमुख रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ शहरातील लोकनियुक्त नगराध्यक्षा कु. सिद्धीताई वस्त्रे यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.
मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पालखी रोड स्टेशन हा महत्त्वाचा मार्ग असून, या रस्त्याच्या विकासासाठी १० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली. यासोबतच मोहोळ शहरातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोहोळ शहरातील विकासकामांबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर निधीची पूर्तता करण्याच्या दृष्टीने संबंधित प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्याचे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात ओबीसी महाराष्ट्र राज्य प्रमुख रमेश बारसकर, जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, नगराध्यक्षा कु. सिद्धीताई वस्त्रे यांच्यासह शहरप्रमुख अतुल क्षीरसागर, नगरसेवक चंद्रकांत गोडसे, नगरसेवक आबासाहेब बरकडे, नगरसेवक सागर अष्ठुळ, नगरसेवक दौलतराव देशमुख, नगरसेवक अजय कुर्डे, नगरसेवक लखन कोळी, किशोर वस्त्रे, गणेश गावडे, योगेश गायकवाड आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment