दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे १०० टक्के क्षेत्राचे सरसकट पंचनामे करावेत- पालकमंत्री जयकुमार गोरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 5, 2026

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे १०० टक्के क्षेत्राचे सरसकट पंचनामे करावेत- पालकमंत्री जयकुमार गोरे

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे १०० टक्के क्षेत्राचे सरसकट पंचनामे करावेत- पालकमंत्री जयकुमार गोरे




पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्यातील अकराही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्ह्यातील विविध दुष्काळग्रस्त भागांना भेटी देत आहेत. आज त्यांनी सांगोला तालुक्यातील कटफळ येथे भेट देऊन दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.


नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शंभर टक्के क्षेत्राचे पंचनामे करा

दुष्काळामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या शंभर टक्के क्षेत्राचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत. यामध्ये केवळ पिकांचेच नव्हे, तर ऊस, फळबागा तसेच अन्य पिकांच्या नुकसानग्रस्त क्षेत्राचाही समावेश करावा. कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. पंचनामे करताना वस्तुस्थितीची अचूक नोंद घ्यावी. अशा आपत्तीच्या परिस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता ठेवून जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री श्री. गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

गार्डी गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी तलावात पाणी सोडण्याचे निर्देश

पंढरपूर तालुक्यातील गार्डी गावाला कासाळ ओठ्यावरील तलावातून पाणीपुरवठा केला जातो. दुष्काळी परिस्थितीत गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित तलावात पाणी सोडण्याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने आवश्यक नियोजन करावे, असेही त्यांनी सूचित केले.

गुरसाळे येथे ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे पालकमंत्री श्री. गोरे यांनी थांबून ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्या मांडणारे निवेदन त्यांना दिले. स्थानिक प्रश्नांची माहिती घेऊन संबंधित यंत्रणांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.


सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणे, पीक नुकसानीचे अचूक मूल्यांकन करणे आणि ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता निश्चित करणे याला शासनाचे प्राधान्य आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून शेतकरी व नागरिकांना आवश्यक मदत वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

यावेळी आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, माजी आमदार शहाजी पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार बाळूबाई भागवत, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, योगेश कांबळे, पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ-शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages