दिल्लीतील कारवाईचे सोलापुरात तीव्र पडसाद; महाविकास आघाडीकडून काळा दिन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 10, 2026

दिल्लीतील कारवाईचे सोलापुरात तीव्र पडसाद; महाविकास आघाडीकडून काळा दिन

 

दिल्लीतील कारवाईचे सोलापुरात तीव्र पडसाद; महाविकास आघाडीकडून काळा दिन

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या अटकेचा निषेध; निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी



सोलापूर (कटूसत्य वृत्त) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह अन्य खासदारांवर झालेल्या कथित लाठीचार्ज, धक्काबुक्की आणि अटकेच्या कारवाईचे पडसाद सोलापुरात उमटले. या कारवाईच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने काळा दिन पाळण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दिल्लीतील कारवाईचा निषेध करण्यात आला.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे निदर्शने करण्यात आली होती. या आंदोलनादरम्यान राहुल गांधी, प्रियंका गांधी, प्रणिती शिंदे यांच्यासह सुमारे ३०० खासदारांवर पोलिसांनी लाठीचार्ज, धक्काबुक्की करून अटक केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या कारवाईमुळे लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचत असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, भीमाशंकर जमादार, सुलेमान तांबोळी, भारत जाधव, प्रशांत साळे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, प्रा. सिद्राम सलवदे, सुदर्शन आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, दत्ता घोडके, तुषार साठे, प्रशांत गायकवाड, मौलाली शेख, दत्तात्रय पवार, तुकाराम भडकुंबे, युवराज कापसे आदी उपस्थित होते.

आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याचे पद महत्त्वाचे असून, अशा प्रमुख नेत्यांसह महिला खासदारांना धक्काबुक्की करून फरपटत नेणे ही लोकशाहीची पायमल्ली असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या कारवाईचा निषेध म्हणून काळा दिन पाळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांनी स्पष्ट केले.

राजीनाम्याशिवाय माघार नाही

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित गैरकारभाराबाबतची माहिती जनतेसमोर आली असून, त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी लढा सुरूच राहील, अशी भूमिका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी मांडली. जोपर्यंत ज्ञानेश कुमार पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages