जिंकणारा खेळाडू आनंद देतो व पराभवातून शिकणारा खेळाडू इतिहास घडवतो- मालोजीराजे देशमुख
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- कराटे ही केवळ स्वसंरक्षणाची कला नाही, तर ती शारीरिक आणि मानसिक विकास घडविणारी एक प्रभावी जीवनशैली आहे. प्रतिस्पर्ध्याला सन्मान द्या आणि खिलाडूवृत्ती जपा. तुमचे खरे यश केवळ पदकात नसून तुमच्या शिस्तीत, मेहनतीत आणि चारित्र्यात आहे.जिंकणारा खेळाडू आनंद देतो व पराभवातून शिकणारा खेळाडू इतिहास घडवितो असे मत एस.एन.डी.स्कूलचे चेअरमन मालोजीराजे देशमुख यांनी व्यक्त केले.
ते नातेपुते येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर व एस एन डी इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल नातेपुते यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या माळशिरस तालुका स्तरीय शालेय कराटे स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. ते पुढे बोलत असताना म्हणाले की,खेळाडूंनो, स्पर्धेत विजय मिळवणे महत्त्वाचे आहेच; परंतु पराभव स्वीकारून त्यातून शिकणे हे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. आज तुम्ही जिंकलात तर तुमच्या यशाचा आनंद साजरा करा आणि पराभूत झालात तर निराश न होता अधिक मेहनत करण्याचा संकल्प करण्याचा सल्ला कराटे खेळाडू यांना मालोजीराजे देशमुख यांनी दिला. यावेळी एस एन डी स्कूलचे सेक्रेटरी रोहित शेटे तसेच शक्ती पलंगे इमाम मुलानी मुख्याध्यापक संदीप पानसरे सोलापूर जिल्हा स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम वाघमारे सचिव मनोज राऊत उपस्थित होते. यावेळी मालोजीराजे देशमुख व मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व स्पर्धकांची फाईट लावून उद्घाटन करण्यात आले. माळशिरस तालुक्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते. स्पर्धा १४, १७ आणि १९ वर्षांखालील वयोगटांमध्ये घेण्यात आल्या. असून सदर स्पर्धा नातेपुते येथील राजवैभव सांस्कृतिक भवन येथे पार पडल्या या स्पर्धेसाठी पंच व परीक्षक म्हणून गौतम वाघमारे, सुनील वाघमारे, यजवेंद्र चौधरी, मयंक स्वामी आणि मनोज राऊत यांनी काम पाहिले. स्पर्धा नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी माळशिरस तालुक्यातील क्रीडा शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब धोपे यांनी केले. स्पर्धेचे प्रास्ताविक मनोज राऊत यांनी केले, तर प्रकाश काशीद यांनी उपस्थित मान्यवर, क्रीडा शिक्षक, पंच, परीक्षक आणि सहभागी खेळाडूंचे आभार मानले. स्पर्धा पाहण्यासाठी कराटे खेळाडूंचे अनेक पालक व प्रेक्षक उपस्थित होते.या स्पर्धेमुळे तालुक्यातील शालेय खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील कराटे खेळाला चालना मिळेल आणि गुणवंत खेळाडूंना जिल्हास्तरावर चमकण्याची संधी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments:
Post a Comment