शिक्षक मतदारसंघातील प्रतिनिधित्व कोल्हापूरकडेच; विरोधी आव्हाने मोडत कौस्तुभ गावडेंचा विजय
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुणे शिक्षक मतदारसंघातील विधान परिषदेचे प्रतिनिधित्व कोल्हापूर जिल्ह्यातच कायम राहिले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून विजयी झालेले प्रा.जयंत आसगावकर यांना त्यांची निष्क्रियता नडली.
तर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेचे बंड आणि ‘झेन झी’ भाजपच्या विरोधात असल्याचा सूर मोडून काढत कौस्तुभ गावडे यांच्या रूपाने पुन्हा एकदा या मतदारसंघात भाजपचा भगवा फडकला आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात यावेळी दुहेरी बंडखोरी झाल्याने भाजपसमोर कडवे आव्हान उभे ठाकले होते. पश्चिम महाराष्ट्रात शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे असलेल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रिंगणात उतरवण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष म्हणून प्रयत्न केले होते. तर त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठबळ दिले होते.
युवा चेहरा भावला
गावडे यांची उमेदवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर झाली तेव्हा गावडे यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने सहकार्य केले नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल, असेही स्पष्टपणे सांगितले होते. त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा, शिक्षकांच्या विविध आंदोलनातील सक्रिय सहभाग, तरुण वय, चंद्रकांत पाटील यांनी उभी केलेली प्रचाराची यंत्रणा, शिक्षक संघटनांसह भाजप कार्यकर्त्यांनी केलेले प्रयत्न यामुळे या मतदारसंघात सर्वात तरुण आमदार म्हणून कौस्तुभ गावडे हे विजयी झाले आहेत. पण तत्पूर्वी त्यांचा मार्ग अडथळ्यांनी भरलेला होता.
नवी आव्हाने
असे असले तरी कौस्तुभ गावडे यांच्या रूपाने या मतदारसंघाची आमदारकी मात्र पुन्हा कोल्हापुरातच राहिली आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने समाधानाची बाब ठरली आहे. शिक्षण क्षेत्रात शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिक्षण संस्था, समाजाच्या भावना अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ उभे आहे. त्याला भिडून ते प्रश्न राज्य शासनाकडून सोडवण्याचे आव्हान युवा आमदार कौस्तुभ गावडे यांच्यासमोर असणार आहे.

No comments:
Post a Comment