पुणे शिक्षक मतदारसंघात १,६०० बोगस मतदार? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 24, 2026

पुणे शिक्षक मतदारसंघात १,६०० बोगस मतदार?

 पुणे शिक्षक मतदारसंघात १,६०० बोगस मतदार?



मतदानाला एक दिवस बाकी असताना अमोलबापू शिंदे यांची तक्रार

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला अवघा एक दिवस शिल्लक असताना मतदार यादीतील कथित बोगस नोंदींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुणे विभागात सुमारे १,६०० बोगस मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे यांनी केला आहे. पंढरपूर तालुक्यातच ३०० ते ४०० बोगस मतदार असल्याचा दावा त्यांनी केला असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे केली आहे.
 शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी संबंधित मतदार शिक्षक असणे आवश्यक आहे. मात्र, शिक्षक नसलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीत आलीच कशी, असा सवाल उपस्थित करत शिंदे यांनी या नोंदींच्या वैधतेची तपासणी करण्याची मागणी केली आहे. मतदार नोंदणी प्रक्रियेत अनियमितता झाली असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
 पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला सुमारे १,६०० कथित बोगस मतदारांचा मुद्दा उपस्थित झाल्याने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः पंढरपूरसारख्या तालुक्यात ३०० ते ४०० संशयित मतदार असल्याचा दावा करण्यात आल्याने सोलापूर जिल्ह्यातही या तक्रारीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
मतदार यादीतील नोंदींची पडताळणी करून पात्र आणि अपात्र मतदार निश्चित करावेत. शिक्षक नसलेल्या व्यक्तींची नावे आढळल्यास नियमानुसार ती रद्द करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी अमोलबापू शिंदे यांनी केली आहे.
 मतदानासाठी अवघा एक दिवस उरलेला असताना ही तक्रार करण्यात आल्याने प्रशासनासमोर वेळेत पडताळणी करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जातात, कथित बोगस नोंदींची पडताळणी होते का आणि त्यातून काय निष्पन्न होते, याकडे आता लक्ष लागले आहे.
चौकट :
सत्तेचा गैरवापर करून बोगस मतदार घुसविण्याचा आरोप
महापालिका निवडणुकीपासून सत्ताधारी सत्तेचा कशा पद्धतीने गैरवापर करतात, हे आपण पाहत आहोत. आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही बोगस मतदार घुसविण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे यांनी केला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी मतदार यादीतील संशयास्पद नोंदींची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
....
शिक्षक मतदारसंघाची यादी अंतिम; नावे डिलीट करता येणार नाहीत!
बोगस मतदारांच्या ३२ तक्रारी; ११ जणांवर फौजदारी कारवाई,िजल्हाधिकारी
सोलापूर, शहर प्रतिनिधी
 पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, आता या यादीतून कोणत्याही मतदाराचे नाव वगळता येणार नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही तसे अधिकार नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
 दरम्यान, शिक्षक नसतानाही शिक्षक मतदारसंघाच्या यादीत नावे समाविष्ट झाल्याप्रकरणी आतापर्यंत ३२ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ११ प्रकरणांत संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना शिक्षक मतदारसंघातील कथित बोगस मतदारांचा मुद्दा चर्चेत आला आहे. मतदार यादीत शिक्षक नसलेल्या व्यक्तींची नावे समाविष्ट झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी मतदार यादी आणि तक्रारींबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.
 पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता या यादीतून कोणत्याही मतदाराचे नाव डिलीट करता येणार नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनाही अंतिम यादीतून नावे वगळण्याचे अधिकार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मतदानाच्या तोंडावर बोगस मतदारांच्या नावांबाबत तक्रारी झाल्या असल्या, तरी अंतिम मतदार यादीतून नावे वगळण्याची कार्यवाही करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
 माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षक नसलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. मतदार यादीत अपात्र व्यक्तींची नावे समाविष्ट झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित दोषींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले.
 शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला एक दिवस शिल्लक असताना बोगस मतदारांच्या तक्रारींमुळे निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. अंतिम मतदार यादीतून नावे वगळता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले, तरी संशयित मतदार आणि नोंदणी प्रक्रियेत दोषी आढळणाऱ्यांबाबत चौकशी सुरू राहणार आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी या प्रकरणाचा राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.
....

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages