तुळजाभवानीच्या भक्तांसाठी दोन दशकांची अखंड सेवा; शिरापूरच्या चव्हाण परिवाराचा स्त्री शक्तीचा जागर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अनवाणी पायाने शेकडो किलोमीटर चालणाऱ्या भाविकाला माऊलीच्या मायेने हाक मारून गरम चहा, नाश्ता पुढे करणे हीच खरी ईश्वरसेवा. हीच भावना जपत शिरापूरच्या चव्हाण परिवाराने गेल्या २० वर्षांपासून मानवतेचा यज्ञ अखंड तेवत ठेवला आहे.
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी शिरापूर (सो) येथील उजनी कॅनॉल च्या डीपकटजवळ चव्हाण परिवाराच्या वतीने लावण्यात येणाऱ्या चहा, नाश्ता आणि औषधोपचार स्टॉलचे यंदाचे हे २० वे वर्ष आहे. यंदाच्या या स्टॉलचे उदघाटन शिरापूर पंचायत समितीच्या सदस्या नीलम मसलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चव्हाण परिवारातील सर्व महिलांची उपस्थिती हीच खरी स्त्री शक्तीचा जागर ठरली.
माळशिरस ते सांगोला, हजारो भाविकांचा विसावा शिरापूरातच.
सोलापूर जिल्ह्यातील
माळशिरस, करमाळा, माढा, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या तालुक्यांमधून लांबोटी-शिरापूर-मोरवंची-रा नमसले वडाळा केमवाडी काठी सावरगाव सांगवी मार्गे तुळजापूरला जाणाऱ्या हजारो भाविकांसाठी शिरापूर हे हक्काचे थांब्याचे ठिकाण बनले आहे.
२००६ साली सुरू झालेला हा उपक्रम आज मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झाला आहे. करिता प्रशांत कुंभार, तात्या आरेकर आणि समस्त शिरापूर ग्रामस्थांच्या सहकार्याने येथे भाविकांना चहा, दूध, मसाला दूध, कॉफी, नाश्ता आणि औषधोपचाराची सुविधा मोफत दिली जाते. दरवर्षी २० ते ३० हजार भाविक या सेवेचा लाभ घेतात, अशी माहिती मच्छिंद्र चव्हाण यांनी दिली.
"वेळा बदलल्या, पिढ्या बदलल्या तरी सेवा खंडित होणार नाही," असा निर्धार ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments:
Post a Comment