मराठा विद्यार्थ्यांच्या शुल्कवसुलीला लगाम!; ओबीसींपेक्षा जास्त फी घेता येणार नाही
मुंबई (कटूसत्य वृत्त):- मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.
मराठा विद्यार्थ्यांकडून ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शिक्षण शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारू नये, तसेच शुल्क भरले नसले तरी प्रवेशप्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण करू नये, असे स्पष्ट निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांवर कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत.
अंमलबजावणीवर लक्ष शासन निर्णयाची केवळ कागदोपत्री अंमलबजावणी न होता त्याचा प्रत्यक्ष लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, या दृष्टीने संबंधित विभागांनी कार्यवाही करणे अपेक्षित आहे. तसेच, शासन निर्णय आणि मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्देशांनुसार केलेल्या कार्यवाहीचा सद्यःस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
संबंधित विभागांवर असणार सवलतींची जबाबदारी मराठा विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलतींची अंमलबजावणी सुनिश्चित करण्याची जबाबदारी संबंधित विभागांवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार विभागांनी आपल्या अखत्यारीतील शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांना सूचना द्याव्यात, असे नमूद केले आहे. निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम विद्यार्थ्यांकडून घेतली जाणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारीही संबंधित विभागांवर असेल. त्यामुळे शैक्षणिक सवलतींच्या लाभासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागू नये, हा या निर्देशांचा राज्य सरकारचा उद्देश आहे.

No comments:
Post a Comment