‘तुम्हाला बिनडोकांचे राष्ट्र हवे आहे का?’ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 8, 2026

‘तुम्हाला बिनडोकांचे राष्ट्र हवे आहे का?’

 ‘तुम्हाला बिनडोकांचे राष्ट्र हवे आहे का?’

शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यात डॉ. अभिजित वैद्य यांचा परखड सवाल



पुणे,  (कटूसत्य वृत्त):- “आजची शिक्षणपद्धती ज्ञानार्थी नव्हे, तर केवळ परीक्षार्थी निर्माण करत आहे. शिक्षणातील अडथळे पार करून ज्ञान मिळविणाऱ्या, लोकशाहीवादी किंवा गांधीवादी विचारांच्या बुद्धिजीवींनाही ‘शहरी नक्षल’ आणि आता ‘दिमागी नक्षल’ म्हटले जात आहे. बुद्धिजीवींना ‘दिमागी नक्षल’ म्हणणार असाल, तर तुम्हाला बिनडोकांचे राष्ट्र हवे आहे का?” असा परखड सवाल भाई वैद्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य यांनी केला.

‘भाई वैद्य फाउंडेशन’ आणि ‘आरोग्य सेना’ यांच्या वतीने आयोजित लोकनेते भाई वैद्य गुणवंत व गरजू विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या कुलगुरू आबेदा इनामदार, प्रा. डॉ. गीतांजली वैद्य, वर्षा गुप्ते, लक्ष्मीकांत मुंदडा आदी उपस्थित होते.

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी पुण्यातील २४ शाळांमधील १०० गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी १२ हजार रुपये याप्रमाणे एकूण १२ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली.

डॉ. अभिजित वैद्य म्हणाले, “शिक्षणासाठीची अर्थसंकल्पीय तरतूद कमी करून सरकारी शिक्षणव्यवस्था मोडीत काढली जात आहे. दुसरीकडे शिक्षणाचे खासगीकरण करून ते महाग केले जात आहे. गरीब विद्यार्थी या अडथळ्यांवर मात करून शिकला, तरी रोजगाराच्या अभावामुळे त्याच्यासमोर बेरोजगारीचे संकट उभे राहते.”

विज्ञान तरुणांना प्रश्न विचारायला आणि चिकित्सक विचार करायला शिकवते. त्यामुळे अंधश्रद्धा आणि कर्मकांडांच्या माध्यमातून तरुणांना विज्ञानापासून दूर नेण्याचा प्रयत्न होता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“ज्या दिवशी मंत्री आणि शिपायाची मुले एकाच शाळेत शिकू लागतील, त्याच दिवशी शिक्षण व्यवस्थेत खऱ्या अर्थाने आमूलाग्र परिवर्तन होईल. हेच लोकनेते भाई वैद्य यांना अभिप्रेत होते,” असेही डॉ. वैद्य यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन केतकर यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages