अभिनयातील ‘नटसम्राट’ हरपला;संवेदनशील मनाचा अभिनेता आणि समाजसेवक काळाच्या पडद्याआड – मंत्री जयकुमार रावल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 8, 2026

अभिनयातील ‘नटसम्राट’ हरपला;संवेदनशील मनाचा अभिनेता आणि समाजसेवक काळाच्या पडद्याआड – मंत्री जयकुमार रावल

 

अभिनयातील ‘नटसम्राट’ हरपला;संवेदनशील मनाचा अभिनेता आणि समाजसेवक काळाच्या पडद्याआड – मंत्री जयकुमार रावल



मुंबई (कटूसत्य वृत्त):-आपल्या दमदार आणि सहजसुंदर अभिनयाने असंख्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद, धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारे आहे. त्यांच्या निधनाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीने केवळ एक महान अभिनेता गमावला नसून, सामाजिक बांधिकीसह माणुसकीची जाण असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्वही गमावले आहे, अशा शब्दांत मंत्री जयकुमार रावल यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

‘परिंदा’, ‘प्रहार’, ‘क्रांतिवीर’, ‘खामोशी’, ‘अग्निसाक्षी’, ‘नटसम्राट’, ‘वेलकम’ यांसह असंख्य चित्रपटांमधून नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाची स्वतंत्र आणि अमीट ओळख निर्माण केली. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत केवळ अभिनय नव्हता, तर त्या व्यक्तिरेखेतील देशभक्ती, समाजमनाच्या भावना, संघर्ष, वेदना आणि संवेदना अक्षरशः जगण्याची ताकद होती. त्यामुळे नाना पाटेकर हे नाव भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा एक वेगळा मापदंड म्हणून सदैव स्मरणात राहील.

पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या नाना पाटेकर यांनी पडद्याबाहेरही माणुसकीची नाळ घट्ट जपली. शेतकरी, दुष्काळग्रस्त आणि ग्रामीण भागातील गरजू जनतेच्या प्रश्नांप्रती त्यांनी सातत्याने संवेदनशीलता दाखवली.नाम फाउंडेशन च्या माध्यमातून जलसंधारण आणि निसर्ग संवर्धन यात त्यांनी महाराष्ट्रात प्रेरणादायी काम केले. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी केलेले कार्य त्यांच्या मनातील माणुसकी आणि समाजाप्रती असलेली कृतज्ञता अधोरेखित करणारे आहे,असे मंत्री जयकुमार रावल म्हणाले.

नाना पाटेकर यांचा बुलंद आवाज, त्यांचे प्रभावी संवाद आणि त्यांच्या भूमिका आता प्रत्यक्ष अनुभवता येणार नसल्या, तरी त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा आणि त्यांनी जपलेली माणुसकीची मूल्ये,देशसेवा सह समाजसेवेची प्रेरणा कायम स्मरणात राहतील. त्यांच्या अभिनयाची उंची आणि सामाजिक जाणिवेची व्याप्ती पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

नाना पाटेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राची तसेच समाजमनाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबीय, आप्तस्वकीय, सहकलाकार आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. महान कलावंत, संवेदनशील व्यक्तिमत्त्व आणि अभिनयातील ‘नटसम्राट’ नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, असे मंत्री जयकुमार रावल यांनी शोक संवेदना व्यक्त करताना म्हटले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages