तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूलची दमदार कामगिरी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केगाव येथील सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. १४ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत शाळेच्या संघाने उपविजेतेपद पटकावले, तर ॲथलेटिक्स स्पर्धेत इयत्ता दहावीतील सुयश भोसले याने ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या नावलौकिकात भर घातली.
शिवप्रभू माध्यमिक प्रशाला येथे ७ व ८ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सिंहगडच्या संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. उपांत्य फेरीत नालंदा आश्रम, भोगाव संघाचा ११ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात सिंहगडने ५२ धावा केल्या, तर प्रतिस्पर्धी संघाला ४१ धावांवर रोखले. अंतिम सामन्यातही खेळाडूंनी जिद्दीने लढत दिली. मात्र, संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
दरम्यान, ॲथलेटिक्स स्पर्धेत सुयश भोसले याने ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावत आपल्या वेगवान धावण्याची आणि क्रीडाकौशल्याची चमक दाखवली. त्याच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एका मानाच्या यशाची भर पडली.
या दुहेरी यशाबद्दल सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा सिंहगड इन्स्टिट्यूट, केगावचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळातील यशासाठी जिद्द, शिस्त, सातत्यपूर्ण सराव आणि सांघिक भावना महत्त्वाची असून, विद्यार्थ्यांनी भविष्यातही उत्कृष्ट कामगिरी करावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
या यशाबद्दल प्रशालेच्या प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, उपप्राचार्या निकहत शेख, शिक्षकवृंद, क्रीडा विभाग आणि पालकांनी खेळाडूंचे कौतुक केले. क्रिकेटमधील सांघिक यश आणि धावण्याच्या स्पर्धेतील वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरीमुळे सिंहगड पब्लिक स्कूलने तालुकास्तरावर आपली क्रीडा गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment