विठ्ठलराव शिंदे कामगार पतसंस्थेची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 1, 2026

विठ्ठलराव शिंदे कामगार पतसंस्थेची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

 विठ्ठलराव शिंदे कामगार पतसंस्थेची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न


टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता कारखाना कार्यस्थळावर खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. संस्थेचे चेअरमन तथा कार्यकारी संचालक डॉ. संतोष डिग्रजे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज पार पडले.
सभेच्या प्रारंभी कामगार पतसंस्थेचे सभासद सचिन चौगुले यांनी सभेच्या अध्यक्षपदी डॉ. संतोष डिग्रजे यांच्या निवडीची सूचना मांडली. या सूचनेस संचालक चंद्रकांत कुटे यांनी सभासदांच्या वतीने अनुमोदन दिले. त्यानंतर श्रद्धास्थान कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे ज्येष्ठ सभासद लक्ष्मण घोडके व तानाजी दोरगे यांच्या हस्ते करण्यात आले.
अहवाल सालात निधन झालेल्या संस्थेच्या सभासदांसह हितचिंतक तसेच शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील दिवंगत व्यक्ती आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले स्त्री-पुरुष व जवान यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याबाबतचा श्रद्धांजली ठराव संस्थेचे संचालक तानाजी लोंढे यांनी मांडला.
सभेच्या कामकाजात संस्थेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात केलेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. संस्थेचे सचिव उत्तम माळवदकर यांनी १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील विविध विषयांचे वाचन केले. सभेसमोर मांडण्यात आलेल्या सर्व विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
यावेळी संस्थेचे चेअरमन तथा कार्यकारी संचालक डॉ. संतोष डिग्रजे यांनी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी संस्थेला ‘अ’ वर्ग ऑडिट प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या आर्थिक वर्षात संस्थेला १ कोटी ४० लाख ४८ हजार रुपयांचा नफा झाला असून सभासदांना ८ टक्के लाभांश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पतसंस्थेच्या प्रगतीमध्ये कामगार सभासदांचा मोठा सहभाग असून संस्थेला नावारूपास आणण्यासाठी सभासदांनी दिलेले सहकार्य महत्त्वाचे आहे. भविष्यातही पतसंस्थेच्या प्रगतीसाठी सभासदांनी अशाच प्रकारे सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. संतोष डिग्रजे यांनी केले.
सभेच्या शेवटी संस्थेचे संचालक दिलीप लव्हटे यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानले. सभेचे सूत्रसंचालन आर. एम. जाधव यांनी केले.
यावेळी कामगार पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संभाजी थिटे, सर्व संचालक मंडळाचे सदस्य तसेच कारखान्याचे कामगार सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages