मनोरमा महाभोंडल्यातून संस्कृती आणि स्त्रीशक्तीचा जागर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 22, 2026

मनोरमा महाभोंडल्यातून संस्कृती आणि स्त्रीशक्तीचा जागर

 मनोरमा महाभोंडल्यातून संस्कृती आणि स्त्रीशक्तीचा जागर




सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा सोलापूर पश्चिम, मनोरमा साहित्य मंडळी सोलापूर तसेच मनोरमा बँक परिवार व मनोरमा मल्टी स्टेट परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मनोरमा महाभोंडला’ हा पारंपरिक लोकसंस्कृतीचा जागर करणारा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मनोरमा सांस्कृतिक भवन, बेन्नूर नगर, नवीन आरटीओ कार्यालयाजवळील मनोरमा बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दीपप्रज्वलन तसेच देवी आणि हत्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या शेकडो महिलांनी हत्तीभोवती भोंडल्याचा फेर धरत ‘ऐलमा पैलमा’पासून विविध पारंपरिक व आधुनिक देवीगीतांचे सादरीकरण केले. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि पारंपरिक संस्कृतीचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमात महिलांच्या स्वसंरक्षणासाठी तायक्वांदो व लाठी-काठीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. भारती विद्यापीठातील नेताजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींच्या समूहाने तायक्वांदोचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच मानस करकंटी व त्यांच्या विद्यार्थिनींनी लाठी-काठीचे प्रात्यक्षिक दाखविले. महिलांनी या प्रात्यक्षिकांना उत्स्फूर्त दाद दिली. लाठी-काठीसारख्या पारंपरिक कला आत्मसात करून महिलांनी स्वसंरक्षणासाठी सज्ज राहण्याबरोबरच भारतीय परंपराही जपली पाहिजे, असे अर्चना बर्डे यांनी सांगितले.
सध्याच्या डिजिटल युगात महिलांना कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) माहिती असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर उत्तरा बर्डे यांनी महिलांना कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन करून जनजागृती केली.
कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा’ म्हणून सन्मान
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ‘नवदुर्गा’ म्हणून सन्मान करण्यात आला.
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर,  एकल महिला धोरण कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य सदस्य, डॉ. प्रीती देशमुख,  डॉ. संध्या रघोजी, डॉ. दिपाली गोरे, डॉ. अश्विनी धोंड, डॉ. प्राजक्ता पोपटानी, डॉ. वर्तिका अगरवाल, लॉन टेनिस राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या संध्याराणी बंडगर आणि सामाजिक कार्यकर्त्या  उमा देग्गीनाळ यांचा शाल, रोप, पुस्तके व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
डॉ. संध्या रघोजी यांनी मनोगतात वाचन संस्कृतीचे महत्त्व सांगत, मनोरमा महाभोंडल्याच्या माध्यमातून केवळ मनोरंजन नव्हे तर विचारांचा जागरही होत असल्याचे नमूद केले.ज्ञानेश्वरी देवकर म्हणाल्या, मनोरमा परिवार विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहे. डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू तसेच बालकलाकारांचा सन्मान करत पारंपरिक पद्धतीने संस्कृतीचे जतन करणारा हा उपक्रम आदर्शवत आहे.
मनोरमा मल्टी स्टेटच्या अध्यक्षा शोभा मोरे म्हणाल्या, “मनोरमा परिवार हा आईच्या नावाने उभा राहिलेला परिवार आहे. आईचा जागर करताना प्रेम, सन्मान आणि संस्कारांचा वसा पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन पिढीला आपली परंपरा आणि संस्कृती समजावी, यासाठी विचार, संस्कृती आणि स्त्रीशक्तीचा जागर करण्याचा हा उपक्रम असल्याचे सांगितले. मनोरमा परिवाराच्या कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमात झटपट प्रश्नावली, एका शब्दावर गाणी अशा मनोरंजक उपक्रमांत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. परिवारातील कर्मचाऱ्यांच्या मुली स्वरा शिंदे आणि  अनुजा शेंडगे यांनी कला सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोरमा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  शिल्पा कुलकर्णी यांनी केले. मनोरमा मल्टी स्टेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कविता कुलकर्णी यांनी आभार मानले. विद्या भगरे-भोसले यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी  संचालिका, डॉ. ऋचा पाटील, डॉ. मिताली मोरे, चाफा ग्रुपचे सदस्य तसेच मनोरमा परिवारातील कर्मचारी व महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोरमा परिवारातील कर्मचारी व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages