समाज विज्ञान निष्ठ होण्यासाठी संस्कृतीची जोड आवश्यक- चंद्रकांत पाटील
मराठा समाज सेवा मंडळाचा दसरा महोत्सव साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरात समाज अल्प असला तरी समाजाचे कार्य आदर्शवत असून समाज खऱ्या अर्थाने विज्ञाननिष्ठ व्हायचा असेल तर त्याला संस्कृतीची जोड देणे ही तितकेच आवश्यक आहे. असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी प्रशालेतील राजर्षी शाहू सभागृहात मराठा समाज सेवा मंडळातर्फे आयोजित दसरा महोत्सव व वैचारिक सिमोल्लंघन आणि शिवतीर्थ पुरस्काराचे वितरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे हे होते. याप्रसंगी आईशक्ती फाउंडेशनचे संस्थापक मोहन डांगरे संस्थेचे सचिव राजेंद्र शिंदे, खजिनदार महादेव गवळी,संचालक विनायकराव पाटील,नीलकंठ वाघचौरे, अशोक चव्हाण,प्रभाकर खंडाळकर,मंगेश जाधव, सुरेश पवार, अलका सुरवसे,आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रस्ताविक संस्थेचे सरचिटणीस महेश माने यांनी केले.
पाटील म्हणाले समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण सामाजिक जाणीव आणि सक्षम नेतृत्व महत्वाचे असून मराठा समाज सेवा मंडळाची त्या दृष्टीने होणारी वाटचाल कौतुकास्पद आहे. या संस्थेला प्रदीर्घ शैक्षणिक व सामाजिक वारसा लाभला असून जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन उत्तम विद्यार्थी घडविण्याचे कार्य संस्थेकडून होत आहे. ही खूप मोठी आनंदाची बाब आहे.
यावेळी अध्यक्षीय मनोगतात सपाटे यांनी मराठा समाज सेवा मंडळ आणि यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून आपण शिक्षणाची गंगोत्री समाजातील तळागाळाला लोकापर्यंत नेल्याचे सांगितले. तसेच आपण यशवंतराव चव्हाण आणि ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार चालणारे यांचे पाईक असून जीवनाच्या शेवटपर्यंत शरद पवारांची साथ सोडणार नसल्याचे नमूद केले.
दरम्यान यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्यासह अमोल शिंदे, अनंत जाधव, मनीष केत, विनोद भोसले, वृक्षाली चालुक्य, मनोरमा सपाटे,मृण्मयी गवळी, पुनम काशीद,कल्पना कदम, श्रद्धा पवार,या समाजातील नूतन नगरसेवकांचा संस्थेच्या वतीने मंत्री पाटील यांच्या हस्ते शिवतीर्थ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास प्राचार्य डॉ.नितीन मोटे,सुजाता जुगदार तानाजी माने,मधुकर पवार,मोहम्मद शेख,मंजुश्री पाटील, किशोर बनसोडे,उषा गोखळे,सुनिता निकम,अनिता माने,सीताबाई गायकवाड, दत्ता भोसले,यांच्यासह शिक्षक -शिक्षिकेतर कर्मचारी व समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन सारिका महामुनी पंडित यांनी केले तर संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे यांनी आभार मानले.
.png)
No comments:
Post a Comment