महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध
उपक्रम 22 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 या कालावधीत कार्यक्रमांचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे सन 2027 मध्ये 200 वे वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये एप्रिल 2026
ते एप्रिल 2027 या कालावधीत वर्षभर विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले हे आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी स्त्री शिक्षण, सामाजिक समता, शेतकरी कल्याण आणि सामाजिक न्यायासाठी मोलाचे कार्य केले. त्यांच्या विचारांचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा, तसेच संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि
लोकशाहीविषयक जाणीव विकसित व्हावी, या उद्देशाने हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या उपक्रमांतर्गत 22 एप्रिल 2026 रोजी महात्मा फुले जयंती उद्घाटन व प्रतिमा पूजन, विचार जनजागृती रॅली, शाळास्तरावर भित्तीचित्र अभियान आणि जीवनपरिचय आढावा यांचे आयोजन करण्यात येणार आहे. जून महिन्यात जलसंवर्धन अभियान, शेतकरी व जलव्यवस्थापनविषयक उपक्रम, बालसभा आणि शाळा स्वच्छता अभियान राबविण्यात येईल. जुलै महिन्यात समता कथा व चर्चा, महात्मा फुले लिखित अखंड पाठांतर स्पर्धा, गावांमध्ये समता भिंत उपक्रम
आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यासाठी समता दौड आयोजित केली जाणार आहे. ऑगस्ट महिन्यात वृक्षारोपण, देशभक्तीपर गीत कार्यक्रम, वक्तृत्व व प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच महात्मा फुले साहित्य वाचन अभियान
राबविण्यात येईल. सप्टेंबरमध्ये शिक्षक गौरव, नवोपक्रम स्पर्धा, विज्ञान व माहिती-तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम; ऑक्टोबरमध्ये स्त्री सक्षमीकरण, भूमिका अभिनय, पोस्टर स्पर्धा आणि ‘महात्मा फुले शैक्षणिक प्रेरणा सप्ताह' आयोजित करण्यात
येणार आहे. नोव्हेंबरमध्ये संविधानावर आधारित पुस्तकांचे वाचन, नेतृत्व विकास आणि जनजागृती रॅली, तर डिसेंबरमध्ये सांस्कृतिक महोत्सव, चित्रकला स्पर्धा व लोककला सादरीकरण होणार आहे.
जानेवारी 2027 मध्ये प्रकल्पकार्य, स्थानिक इतिहास अभ्यास, मुलाखत उपक्रम व प्रदर्शन; फेब्रुवारीमध्ये वादविवाद, निबंध, प्रकल्प सादरीकरण आणि पोस्टर निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात येतील. मार्च 2027 मध्ये समारोप कार्यक्रम, ‘फुले समता पुरस्कार' वितरण, अनुभव लेखन आणि अहवाल सादरीकरण करण्यात येणार
आहे.
या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, समता, पर्यावरणविषयक जागरूकता, नेतृत्व, सर्जनशीलता, संशोधन आणि अभिव्यक्ती कौशल्ये विकसित होण्यास मदत होणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी व विभागीय अधिकाऱ्यांनी नियोजन आणि संनियंत्रण करावे, असे निर्देश शासनाने दिले आहेत.
No comments:
Post a Comment