शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानासह सर्वांगीण उपायांना प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 30, 2026

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानासह सर्वांगीण उपायांना प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानासह सर्वांगीण उपायांना प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी


महाराष्ट्रातील ९१ लाख १२ हजार ७६५ शेतकऱ्यांना पीएम किसान निधीचे १ हजार ८३५ कोटी रुपये वितरित 



मुंबई(कटूसत्य वृत्त):-   प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २४ व्या हप्त्यापोटी गुजरात मधील बनासकांठा येथे आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील ९१ लाख १२ हजार ७६५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत १ हजार ८३५ कोटी रुपयांचा निधी थेट जमा केला. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक सहाय्याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान, सिंचन, पशुपालन आणि पूरक व्यवसायांना प्राधान्य देत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थान येथून दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभाग घेतला. कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री मोदी म्हणाले, केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे गेल्या काही वर्षांत देशातील शेतकऱ्यांना ५० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली अथवा त्यांच्या खर्चात बचत झाली आहे. देशातील ८५ टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या लहान शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ४ लाख कोटी रुपये थेट बँक खात्यांत देण्यात आले आहेत.

जागतिक बाजारात खतांच्या किमती वाढल्यानंतरही केंद्र सरकारने त्याचा भार शेतकऱ्यांवर पडू दिला नाही. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने सुमारे १६ लाख कोटी रुपये खर्च केले. गेल्या १२ वर्षांत गहू आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीच्या माध्यमातून २४ लाख कोटी रुपये देण्यात आले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांना २ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक भरपाई मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

सिंचनावरील खर्च कमी करण्यासाठी पीएम कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे १२ लाख सौरपंप देण्यात आले आहेत. या पंपांमुळे शेतकऱ्यांची ८० कोटी लिटरपेक्षा अधिक डिझेलची बचत झाली आहे. याशिवाय अतिरिक्त वीज निर्मितीचाही शेतकऱ्यांना लाभ होत असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी स्पष्ट केले.

बदलत्या हवामानाशी सुसंगत बियाण्यांच्या सुमारे तीन हजार नव्या जाती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून, राष्ट्रीय गोकुळ अभियानातून देशी पशुधनाचे संवर्धन आणि वैज्ञानिक प्रजननाला चालना दिली जात आहे. पशूंना लाळ्या-खुरकुत रोगापासून वाचविण्यासाठी देशभर मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे १५० कोटी लसमात्रा देण्यात आल्या असून, ८ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पशुधनाला त्याचा लाभ झाला आहे. देशातील गाय आणि म्हशींचे प्रतिदिन सरासरी दूध उत्पादन २०१३-१४ मधील पाच लिटरपेक्षा कमी पातळीवरून आता सुमारे आठ लिटरपर्यंत वाढल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी नमूद केले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित ‘रन फॉर युनिटी’मध्ये नागरिकांनी, विशेषतः युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages