पंढरपूर तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; सर्वेक्षण व अन्वेषणास मान्यता कल्याणराव काळे यांच्या पाठपुराव्याला यश
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-पंढरपूर तालुक्यातील सिंचन व्यवस्थेला बळकटी मिळावी, शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे आणि पाणीसाठवण क्षमता वाढावी, या उद्देशाने कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागामार्फत सन २०२६-२७ अंतर्गत पंढरपूर तालुक्यातील विविध कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे सर्वेक्षण व अन्वेषण करण्यास दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी मान्यता देण्यात आली आहे.
तालुक्यातील पिराची कुरोली, गुरसाळे, मुंढेवाडी, पुळूज आदी गावांतील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. या बंधाऱ्यांचे सर्वेक्षण व अन्वेषण करून तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे संबंधित बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्याचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे.
पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध व्हावे, नदीतील पाण्याचा प्रभावी वापर व्हावा आणि शेतीच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी कल्याणराव काळे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. संबंधित प्रश्न मार्गी लागावा, यासाठी त्यांनी वेळोवेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तत्कालीन उप मुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार साहेब, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील साहेब, जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, तसेच जिल्यातील खासदार, आमदार यांच्याकडे या कामासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता महत्त्वाचे यश मिळाले असून, बॅरेज निर्मितीच्या दिशेने पुढचे पाऊल पडले आहे. पंढरपूर तालुक्यातील ४ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्या ऐवजी बॅरेजस बांधणीच्या सर्वेक्षणासाठी प्रत्येकी १८ लक्ष रुपये प्रमाणे ७२ लक्ष रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर झाल्यास भविष्यात पाणीसाठवण आणि सिंचन व्यवस्थेत सुधारणा होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा विषय महत्त्वाचा मानला जात आहे असे कल्याणराव काळे म्हणाले.
यावेळी सिताराम कारखान्याचे संचालक महादेव भाऊ देठे, यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी बापू साळुंखे, स.शि.वसंतराव काळे सह.सा.कारखान्याचे माजी संचालक सुधाकर कवडे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment