दुष्काळग्रस्त तालुक्यांत जलसंधारण ;प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे; नाले करणार खोल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यात सन २०२६ च्या खरीप हंगामात ट्रिगर-१ (प्रथम कळ) आणि ट्रिगर-२ (दुसरी कळ) लागू झालेल्या ३०४ तालुक्यांमध्ये मृद व जलसंधारणाची विविध कामे हाती घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासह अपूर्ण कामे पूर्ण करणे, नादुरुस्त बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे, गावांतील जलसाठ्यांमधील गाळ काढणे आणि नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
या प्रत्येक तालुक्यातील गावांमध्ये किमान १०० जलशोषक खड्डे तयार करण्याचे निर्देशही शासनाकडून देण्यात आले आहेत. मृद व जलसंधारण विभागाच्या योजनांमधील प्रगतिपथावरील आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. जलसंधारणाच्या संरचनांची दुरुस्ती, सर्व बंधाऱ्यांवर गेट अथवा फळ्या बसवून पाणी अडविणे आणि त्याची वेळोवेळी पाहणी करणे, नादुरुस्त कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करून नीडल बसविणे.
तसेच गावांतील जलसाठ्यांमधील गाळ काढणे यांचा यात समावेश आहे. याशिवाय, नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण, निराई बंधारे तयार करणे, नाला खोलीकरणाच्या ठिकाणी तसेच बंधारे आणि तलावांमध्ये रिचार्ज शाफ्ट घेणे आणि शासकीय व खासगी इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या संरचना उभारणे, अशी कामे करण्यात येणार आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या मृद व जलसंधारणाच्या कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचेही निर्देश दिले आहेत.
विविध निधींचा वापर करणार या कामांसाठी जलयुक्त शिवार अभियान २.०, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.०, जिल्हा नियोजन समितीचा निधी, विशेष घटक योजना, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती उपयोजना, तांडा विकास योजना, नावीन्यपूर्ण योजना आणि जनसुविधांसाठीच्या विशेष अनुदानाचा वापर करता येणार आहे. यासोबतच खनिज विकास निधी, खासदार निधी, आमदार व विधान परिषद सदस्य निधी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर), रोजगार हमी योजना आणि व्हीबी जी राम जी योजनेतील निधी तसेच अन्य उपलब्ध शासकीय निधी स्रोतांतून ही कामे करण्याचे निर्देश आहेत.

No comments:
Post a Comment