"मराठी मुलांना नोकऱ्या मिळणार असतील तर कुणाचेही पाय धरायला तयार"- राज ठाकरे
MPSC च्या विद्यार्थ्यांचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे. आज त्यांनी पुण्यात या आंदोलनाला भेट दिली.सरकारी फसवणुकीमुळे आपल्या आयुष्यातला उमेदीचा काळ कसा जातो हे माझ्यापेक्षा जास्त कुणी सांगू शकणार नाही.
देशभरात जे काही आंदोलन सुरू आहे, मुंबईत आंदोलन झालं परवा. तुमच्याकडे पेपर फुटत आहेत आणि आमच्याकडे मतं फुटत आहेत. बळी दोघेही जात आहोत, पण या सगळ्या गोष्टींमुळे एक एक वर्ष पुढे जातं. जशी तुमच्या आयुष्यातून वर्षे निघून जातात तशी आमच्याही आयुष्यातून जातात असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
संपूर्ण देशात बेधुंदशाही सुरू आहे-राज ठाकरे
संपूर्ण देशभरात बेधुंदशाही सुरू आहे. कुणीही कुणाचं ऐकायला तयार नाही. एकाच बाजूने फक्त मन की बात सुरू आहे. जणू काही दुसऱ्या बाजूला मनच नाही असं म्हणत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टोला लगावला.राज ठाकरे पुढे म्हणाले, मला वाटतं की इथे रोज कुणी तरी येणार भाषण करणार आणि टाळ्या आणि हशा पिकणार यात वेळ घालवू नका. मी तुम्हाला माझं मत सांगतो, माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. या आयुष्यातली वर्षे सरत आहेत. आयुष्य पुढे पुढे जातं आहे. निवडणुका लढवल्यावर आम्हाला कळतं की मतचोरी झाली आहे. अनेक गोष्टी झाल्यावर कळतं आणि दरवेळी पाच-पाच वर्षे निघून जातात. समोर बघितलेला लहान मुलगा एवढा मोठा होतो. तुमची वेदना मला कळू शकते.
देशातली आणि महाराष्ट्रातली परिस्थिती लक्षात घ्या-राज ठाकरे
देशातली आणि राज्यातली परिस्थिती काय आहे? जरा लक्षात घ्या. धार्मिक गोष्टींमध्ये तुम्हाला अडकवलं जातं आहे. कारण रोजच्या विषयांमध्ये तुमचं लक्ष जाऊच नये. जातीपातीचं काहीतरी उकरून काढा. घरी जाऊन आई वडिलांना काय तोंड दाखवणार तुम्ही? हा मराठा, हा माळी, हा धनगर हे सगळं निर्माण केलं जातं आहे. आधी या जातीपातींमधून बाहेर या. मराठवाड्यातून अनेक मुलं पुण्यात शिकायला आली आहेत. रोज अभ्यास करत आहेत, नशिबात काय? पेपर फुटला आहे. तुम्ही हा जो तुमचा राग आहे तो कायम ठेवणं अशक्य आहे. मी तुमच्याशी बोलतो ते सत्य असतं, कडवट असतं पण ते सत्य असतं. कालांतराने कळतं की मी बरोबर बोललो होतो.
७० हजारांची पद भरती होणार नाही हे आज सांगतो-राज ठाकरे
७० हजार मुलांची पद भरती आज सांगतो होणार नाही. हे सगळं आत्ताच लक्षात ठेवा. रोहित पवार या ठिकाणी आहे. दुसरं सरकार आलं तरीही मागणी पूर्ण होऊ शकत नाही हे तुम्हाला सांगतो याचं कारण परिस्थिती आहे. नोकऱ्या मात्र मिळाल्याच पाहिजेत. महाराष्ट्रातल्या नोकऱ्या, काम धंदे मराठी मुला-मुलींना मिळाले पाहिजेत. तुम्हाला जर या गोष्टी मिळाल्या तर आंदोलनांची गरजच उरणार नाही. आपण म्हणतो आरक्षण पाहिजे, सरकारी नोकऱ्या आहेत कुठे? जे काही मिळेल ते खासगी होत चाललं आहे. दिसली जमीन दे अदाणीला, दिसलं विमान दे अदाणीला. सगळ्या गोष्टी खासगी होत आहेत, त्या क्षेत्रात आरक्षण नाही. तुमचा विचार कुणीही करत नाही, कारण तुम्हाला गृहीत धरलं जातं. निवडणुका आल्यानंतर जेवणावळी होतात, पैसे दिले जातात, दारू दिले जाते. त्यातून निवडणुका जिंकल्या जातात. अशातून निवडून आलेल्यांचा गैरसमज तुम्ही दूर करत नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही हे लक्षात ठेवा. पक्ष बदलणाऱ्यांनाही लोक निवडून देतात. तुम्ही जर शिक्षा करायची ठरवली तर सगळे सुतासारखे सरळ होतील. तुम्ही त्यांच्या मनात भीती निर्माण करत नाही तोपर्यंत काही होणार नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना आणि मुलींना नोकऱ्या मिळणार असतील तर राज ठाकरे कुणाचेही पाय धरायला तयार आहे. वस्तुस्थिती काय आहे ते समजून घ्या. तुमचा दबाव वाढला पाहिजे. दबाव काय असतो ते सरकारला कळलं पाहिजे आणि तातडीने त्यांनी पावलं उचलली पाहिजे. मी आज तुम्हाला भेटायला आलो आहे. मी अनेकदा जे बोलतो ते कटू असतं. हळूहळू लोकांना हे समजू लागलं आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा बाळगू असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

No comments:
Post a Comment